Pimpri News: प्रशासकीय कामकाजासाठी महापालिका उभारणार 27 मजली इमारत

300 आसन क्षमतेचे सभागृह; सुमारे 400 कोटींचा खर्च अपेक्षित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी नवीन इमारत बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पिंपरीतील महिंद्रा कंपनी जवळील आरक्षीत जागेचा पर्याय समोर ठेवण्यात आला आहे. या जागेवर आशिया खंडात वैशिष्ट्यपूर्ण इमारत बांधण्याचे नियोजन केले आहे. तब्बल 27 मजली टॉवरप्रमाणे टोलेजंग इमारत असणार आहे. भविष्यातील 50 वर्षांचे नियोजन करून या पर्यावरणपूरक इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे 400 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत पिंपरीत महापालिकेची प्रशासकीय इमारत आहे. या चार मजली इमारतीचे तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांच्या हस्ते 13 मार्च 1987 रोजी उद्घाटन झाले होते. त्यानंतर सातत्याने महापालिकेचे विस्तारीकरण करण्यात आले. तीन मजल्यावर अधिका-यांची दालने तर, एका मजल्यावर पदाधिका-यांची दालने आहेत. सध्या कार्यालये आणि दालनांसाठी जागा अपुरी पडत आहे.

अनेक कार्यालये मुख्यालयातून महापालिकेच्या इतर इमारतीमध्ये स्थलांतरित केली आहेत. अनेक विभागात नागरिकांना बसण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. महापालिकेत वाहनतळ देखील पुरेसे नाही. अधिकारी, नगरसेवकांची वाहनेच पार्क करण्यासाठी जागा अपुरी पडते.

महापालिकेचा नोकर भरतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. नोकर भरतीला मान्यता मिळाल्यास आणि कर्मचारी भरतीनंतर पुन्हा जागेची कमरता भासणार आहे. त्यामुळे महापालिकेने नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचे नियोजन सुरू केले आहे.

काही प्रमुख विभागासाठी प्रशासकीय इमारत न बांधता सर्व विभागांचा समावेश असणारी सुसज्ज 27 मजली टोलेजंग इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील 2 प्रकारच्या आराखड्याचे नुकतेच सादरीकरण करण्यात आले.

त्यासाठी गांधीनगर, पिंपरी येथील महिंद्रा कंपनी जवळील आरक्षीत जागा तसेच पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टीबॉयोटिक्स (एचए) कंपनीच्या जागेचा पर्याय समोर ठेवण्यात आला आहे. या इमारतीच्या आराखड्याचे नुकतेच पालिका पदाधिका-यांसमोर सादरीकरण करण्यात आले.

आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर इमारत आराखड्याचे सादरीकरण केले जाणार आहे. त्यातून योग्य आराखडा व जागा निश्‍चित करून करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

भविष्यातील 50 वर्षांचे नियोजन करून या पर्यावरणपूरक इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रस्तावित इमारतीत प्रत्येक विभागासाठी प्रशस्त दालन व कार्यालय असणार आहे.

तसेच, पदाधिकार्‍यांसाठीही विशेष स्वतंत्र दालने असणार आहेत. त्यात 5 मजली स्वतंत्र इमारत वाहनतळासाठी असणार आहे. त्यात 500 मोटारी व दीड हजार दुचाकी पार्क करता येणार आहेत.

तर, महापालिका सर्वसाधारण सभेच्या सभागृहात तब्बल 300 नगरसेवकांच्या बसण्यासाठी आसन व्यवस्था असणार आहे. इमारतीच्या गच्चीवर हॅलीपॅड असणार आहे. या इमारतीचा संपूर्ण खर्च सुमारे 400 कोटी रूपये अपेक्षित आहे.

”सध्याच्या इमारतीत जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचे नियोजन आहे. महिंद्रा कंपनी जवळील आरक्षीत जागेचा पर्याय समोर ठेवण्यात आला आहे. या इमारतीच्या आराखड्याचे पदाधिका-यांसमोर सादरीकरण झाले आहे. 27 मजली इमारत बांधण्यात येवू शकते असे सादरीकरणात सांगितले आहे. आमदार, खासदार, उपमुख्यमंत्र्यांसमोर एकदा सादरीकरण केले जाणार आहे. त्यांच्यासोबतच्या चर्चेत इमारतीसाठी पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टीबॉयोटिक्स (एचए) कंपनीच्या जागेचाही पर्याय समोर येवू शकतो”. संजय घुबे : कार्यकारी अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.