Pimpri News: सिंचन पुर्नस्थापनेसाठी महापालिका 10 कोटी रूपये ‘पाटबंधारे’ला देणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून टप्पा क्रमांक तीनसाठी सिंचन पुर्नस्थापना खर्चापोटी महापालिका 10 कोटी 8 लाख रुपयांचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) पाटबंधारे विभागाकडे जमा करणार आहे.

महापालिका दररोज 480 एमएलडी पाणी पवना धरणातून घेते. शहरासाठी पवना धरणातून टप्पा क्रमांक चारसाठी 48.576 दशलक्ष घनमीटर एवढे पाणी पुर्नआरक्षित करण्यास राज्य सरकारने 13 नोव्हेंबर 2018 रोजी मंजुरी दिली. त्या अनुषंगाने महापालिकेस सन 2019 मध्ये ज्ञापन आणि इरादा पत्र देण्यात आले आहे. या ज्ञापनातील सर्व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

मात्र, सिंचन पुर्नस्थापना खर्च एकरकमी भरणे बंधनकारक करण्याऐवजी सन 2018-19 पासून पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने घेण्यात यावा, असे धोरण ठरविण्यात आले. त्यामुळे या आरक्षणापोटी सिंचन पुर्नस्थापनेसाठी सन 2018-19, 2019-20 साठीच्या सिंचन पुर्नस्थापना खर्चापोटी 10 कोटी 8 लाख रूपये तसेच दोन महिन्याची पाणीपट्टी अनामत 37 लाख 43 हजार 956 रूपयांचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) पाटबंधारे विभागाकडे जमा करण्यात आला आहे.

पुर्नस्थापना खर्चापोटी तिसऱ्या टप्प्याचे 10 कोटी 8 लाखाचा धनाकर्ष देणे आवश्यक आहे. सन 2020-21 च्या मूळ अंदाजपत्रकात ‘पाणीपुरवठा विशेष योजना’ महापालिकेसाठी पाण्याचा अतिरिक्त स्त्रोत निश्चित करणे. त्यातील पाणीसाठा आरक्षित करणे व तदनुषंगिक कामे करणे. या कामाअंतर्गत 50 कोटी तरतूद उपलब्ध आहे. त्यातून सन 2020-21 साठीच्या तिसरा टप्पा पुर्नस्थापना खर्चापोटी 10 कोटी 8 लाख 3 हजार रुपयांचा धनादेश पाटबंधारे विभागाला देण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.