
Pimpri News: महापालिकेचे असणार ‘ई-बजेट’, अचूकता अन् वेळेची होणार बचत
1 नोव्हेंबरपूर्वी आकडेवारी सादर करण्याचे आयुक्तांच्या सुचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2020-21 चा सुधारीत आणि सन 2021-22 चा मुळ अर्थसंकल्प तयार करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. यंदा ई-बजेट तयार केले जाणार आहे. चालू आर्थिक वर्षापासून महसुली आणि भांडवली अर्थसंकल्प हा लेखा विभागाने तयार केलेल्या ई-बजेट प्रणालीमधुनच सादर केला जाणार आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी सुधारीत आणि मुळ अर्थसंकल्पाची आकडेवारी 1 नोव्हेंबर 2020 पूर्वी लेखा विभागाकडे सादर करावी लागणार आहे. लेखा विभागाकडे सादर केलेल्या या आकडेवारीची योग्य छाननी व दुरूस्ती करून अर्थसंकल्प तयार करण्यात येणार आहे.

स्थायी समिती सभेपुढे दिलेल्या तारखेपूर्वी अर्थसंकल्प मंजुरीसाठी सादर करायचा असल्याने त्यादृष्टीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व विभागांना सुचना दिल्या आहेत.
चालू आर्थिक वर्षापासून महसुली आणि भांडवली अंर्थसंकल्प हा लेखा विभागाने तयार केलेल्या ई-बजेट प्रणालीमधुनच सादर केला जाणार आहे. सर्व विभागांना सद्यस्थितीत लेखा विभागामार्फत देयके ट्रॅक करण्याकरिता युझर आयडी देण्यात आले आहेत.
‘फायनान्सियल अकाऊंटींग’ या संगणक प्रणालीमध्ये ई-बजेट मेनू उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ई-बजेट मेनूमध्ये संबंधित विभागाने त्यांच्या विभागाशी संबंधित सन 2020-21 चा सुधारीत आणि सन 2021-22 च्या मुळ तरतुदी महसुली आणि भांडवली लेखाशिर्षावर भरण्यात याव्यात.
महापालिका सभेने मान्य केलेल्या सन 2021-22 च्या अर्थसंकल्पातील किरकोळ दुरूस्ती देखभाल आणि डांबरी रस्ते अशा भांडवली-महसुली कामांच्या याद्या ई-बजेट मेनूमध्ये उपलब्ध करून दिलेल्या लिंकवरील नमुन्यामध्ये ‘एक्सेल फॉरमॅट’मध्ये अपलोड कराव्यात.
विभागाने अपलोड केलेल्या भांडवली-महसुली कामांच्या याद्यांमधील कामनिहाय अर्थसंकल्पीय रकमांचा वापर सन 2021-22 च्या लेखा संगणक प्रणालीमध्ये बील देण्याकरिता होणार आहे.
यापुढे भांडवली कामांवर देयके ही संपूर्णपणे भांडवली डॅशबोर्ड मधून एक्सपोर्ट न करता ई-बजेट मेनूमधून विभागांमधून प्राप्त झालेल्या अर्थसंकल्पीय रकमांनुसार तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांनी महसुली-भांडवली अर्थसंकल्पात योग्य त्या लेखाशिर्षाखाली सुधारीत व पुढील आर्थिक वर्षासाठी आवश्यक असणा-या रकमा भराव्यात.

या प्रणालीबाबत काही शंका असल्यास लेखा विभागातील संगणक ऑपरेटरशी संपर्क साधावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
#मुळ अर्थसंकल्पातील क्रम चुकवू नये
#साहित्य खरेदी, दुरूस्तीसाठी स्वतंत्र लेखाशिर्ष करावा
#क्षेत्रीय कार्यालयांनी स्वतंत्र महसुली जमा-खर्च दाखवावा
#विभागांनी प्रत्येक कामावर जेवढा प्रत्यक्ष खर्च होणार आहे, तेवढीच तरतुद करावी. अन्यथा विभागप्रमुखांना जबाबदार धरले जाणार
#राखीव निधीबाबत समन्वय साधा
अचूकता अन् वेळेची होणार बचत – जितेंद्र कोळंबे
याबाबत बोलताना पालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे म्हणाले, ”दरवर्षी विभागांकडून हस्तलिखित बजेट घेत होतो. ही वेळखाऊ पद्धत होती. कर्मचा-यांचा वेळ जात होता. त्यामुळे यंदा ई-बजेट तयार केले जाणार आहे. त्यासाठी अप्लिकेशन तयार केले आहे. त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने विभाग आपले बजेट टाकणार आहेत. त्याची तपासणी केली जाईल. यामुळे अचूकता येईल. वेळेची बचत होईल. एखाद्या विभागाला ऑनलाईन बजेट भरण्यास अडचण आल्यास त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक कर्मचा-याची नियुक्ती केली आहे. या प्रणालीबाबत काही शंका असल्यास लेखा विभागातील संगणक ऑपरेटरशी संपर्क साधावा”.
