Pimpri News: महापालिका खासगी रुग्णालयांना आता मोफत प्लाझ्मा देणार

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकडे प्लाझ्मा मागणी करणाऱ्या इतर महापालिका हॉस्पिटल, सरकारी रुग्णालयांमधील रुग्णांसाठी व खासगी रुग्णालयांमधील रुग्णांसाठी अफेरेसीस प्लाझ्मा बॅग्जसाठी रक्त व रक्तघटक अफेरेसीस प्लाझ्मा बॅग्जसाठी शुल्क न आकारता मोफत देण्यात येणार आहे.

पालिकेच्या वतीने फ्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तीस प्रोत्साहनपर रक्कम रुपये दोन हजार प्रति व्यक्ती अदा करण्यास तसेच याकामी येणाऱ्या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समितीने आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्थायी समितीची आज बैठक झाली. महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांच्या झालेल्या आणि येणाऱ्या सुमारे 35 कोटी 35 लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. श्री मोरया गोसावी भक्तांसाठी देऊळ मळा परिसरामध्ये विविध सोयी सुविधा करणेसाठी स्थापत्य विषयक काम करण्यासाठी 43 लाख 85 हजार, दापोडी सुंदरबाग येथे अद्यावत पद्धतीने रस्ता विकसित करण्याकामी 2 कोटी 81 लाख, कासारवाडी शास्त्रीनगर मधील विसावा हॉटेल पर्यंतचा रस्ता अद्यावत पध्दतीने विकसित करण्यासाठी 3 कोटी 47 लाख तर शितळादेवी चौक स.नं.6 ते मुस्लीम दफनभूमी स.नं.15 पर्यंतचा रस्ता अद्यावत पध्दतीने विकसित करणेकामी 3 कोटी 40 लाख खर्च केले जाणार आहेत.

प्रभाग क्र.6 मध्ये महादेवनगर, सदगुरुनगर, लांडगेवस्ती व परिसरात पेव्हींग ब्लॉकची सुधारणा करण्याकामी 30 लाख 35 हजार, चक्रपाणी वसाहत, देवकर वस्ती व परिसरात पेव्हींग ब्लॉकची सुधारणा करण्यासाठी 30 लाख 42 हजार, तर पुणे नाशिक रस्त्याच्या पश्चिम भागात पावसाळी गटरची सुधारणा करण्याकामी 31 लाख 12 हजार खर्च होणार आहेत.

जिजामाता रुग्णालयात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आपत्तकालीन परिस्थिती आणि कोरोनाच्या अटकावासाठी तातडीचे कामकाजास्तव नवीन इमारतीमधील कॉरीडॉर, अंतर्गत आणि बाहय परिसराची दैनंदिन साफसफाई आणि स्वच्छता करुन घेणेकामी 29 लाख 47 हजार खर्च केले जाणार आहेत. ग प्रभागातील स्मशानभूमीमध्ये गॅस/विद्युत वाहिनी बसविणे या कामाकरीता 76 लाख 59 हजार खर्च केले जाणार आहेत. अशा विविध कामांना मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.