Pimpri news: लॉकडाऊन काळात आर्थिक दुर्बल घटकांना महापालिका करणार तीन हजारांची मदत

एमपीसी न्यूज – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात आर्थिक दुर्बल घटकातील कुंटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून तातडीची मदत म्हणून तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत.

शहरातील रिक्षाचालक (बॅचधारक), परवानाधारक फेरीवाले, नोंदणीकृत घरेलु कामगार, चर्मकार (गटई कामगार), नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे चालक, जिम ट्रेनर इत्यादी आर्थिक दुर्बल घटकातील नोंदणीकृत व्यवसाय करणाऱ्यांना मदत दिली जाणार आहे. मदतीची ही रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. याबाबतचा निर्णय स्थायी समिती सभेत घेण्यात आला.

कोविड संसर्ग टाळण्यासाठी शासनाने राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील हातावर पोट असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पारंपरिक व्यवसाय करुन उदरनिर्वाह चालविणाऱ्या लोकांचे कोविडमुळे संपुर्ण व्यवसाय उद्वस्त झाले आहेत.

अशा अडचणीच्या काळात शहरातील आर्थिकदृष्ट्या खचलेल्या या घटकाला दिलासा देण्यासाठी लॉकडाऊन काळात महापालिकेने आर्थिक मदत करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप, भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली होती.

त्यानुसार आज झालेल्या महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीमध्ये राज्यशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन काळात शहरातील रिक्षाचालक (बॅचधारक), परवानाधारक फेरीवाले, नोंदणीकृत घरेलु कामगार, चर्मकार (गटई कामगार), नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे चालक, जिम ट्रेनर इ. आर्थिक दुर्बल घटकातील नोंदणीकृत व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून तीन हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

मदतीची ही रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. याबाबतची माहिती महापौर उष ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितिन लांडगे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.