Pimpri News: पालिकेचे उत्पन्न ‘लॉकडाउन’! सहा महिन्यात मालमत्ता करातून पालिका तिजोरीत केवळ 220 कोटी

पुढील सहा महिन्यात उत्पन्नाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी विशेष योजना - श्रावण हर्डीकर

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनचा फटका पिंपरी-चिंचवड महापालिकेला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. पालिकेचे उत्पन्न लॉकडाऊन झाले असून पालिकेची अर्थचक्र बिघडण्याची शक्यता आहे.

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यात मालमत्ता करातून पालिका तिजोरीत केवळ 220 कोटी 1 लाख रुपये जमा झाले आहेत. 1 लाख 63 हजार 279 मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. मागीलवर्षी पहिल्या सहा महिन्यात 341.56 कोटी रुपये जमा झाले होते. त्या तुलनेत यंदा तब्बल 121.55 कोटी रुपये उत्पन्न कमी मिळाले आहे.

दरम्यान, उत्पन्न कमी मिळेल हे अपेक्षित होते. पुढील सहा महिन्यात उत्पन्नाचा बॅकलॉग भरून काढला जाईल. त्यासाठी विशेष योजना आणल्या आहेत, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात आजमितीला पाच लाख 27 हजार 338 मालमत्ता आहेत. त्यामध्ये निवासी चार लाख 47 हजार 8, बिगरनिवासी 46 हजार 828, औद्योगिक तीन हजार 700, मोकळ्या जागा आठ हजार 781, मिश्र 15 हजार 819 आणि इतर पाच हजार 202 मालमत्ता आहेत. या मालमत्तांना महापालिकेकडून कर आकारणी केली जाते.

वर्षभर 16 विभागीय कर संकलन कार्यालयांमार्फत कर वसुलीचे काम केले जाते. याशिवाय ऑनलाईन देखील कर स्वीकारला जातो. मालमत्ता करातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) बंद झाल्यापासून मालमत्ता कर हाच महापालिका उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात 22 मार्चपासून लॉकडाउन लागू केला होता. त्यामुळे नागरिकांकडून कर भरण्यास अल्प प्रतिसाद मिळाला. त्यातच कर संकलन विभागाची अनास्थाही कारणीभूत आहे.

1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाल्यानंतर तब्बल सव्वा महिन्याने म्हणजेच 10 मे रोजी ऑनलाईन कर भरण्याची सुविधा सुरु केली होती. 16 विभागीय करसंकलन कार्यालये अनेक दिवस बंदच होते. त्यामुळे ज्यांना कराचा भरणा करायचा आहे. त्यांना कर भरणा करता आला नाही. परिणामी, महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे.

चालू 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात 1 लाख 63 हजार 279 मालमत्ताधारकांनी 220.1 कोटी रुपये कराचा भरणा केला आहे. त्यामध्ये थेरगाव विभागीय कार्यालयाकडे सर्वाधिक 54.79 कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. तर, पिंपरीनगर कार्यालयात सर्वात कमी म्हणजेच 1.49 कोटीचा भरणा झाला आहे. आर्थिक वर्षातील केवळ सहा महिने कर संकलन विभागाच्या हाती राहिले आहेत. या सहा महिन्यात कर वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्याचे आव्हान विभागासमोर असणार आहे.

याबाबत बोलताना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”लॉकडाऊनमुळे उत्पन्न कमी मिळेल हे अपेक्षित होते. कोरोनामुळे उत्पन्न घटले आहे. व्यवहार सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यात उत्पन्न वाढ दिसायला लागेल. त्यासाठी विशेष योजना आणल्या आहेत. दंड रक्कम सवलत योजना चालू ठेवली आहे. या सहा महिन्यात उत्पन्नाचा ‘बॅकलॉग’ भरून काढला जाईल. ज्या मालमत्ताची ‘असेसमेंट’ राहिली आहे. त्यासाठी एजन्सी नियुक्त केली आहे. त्यातून देखील काही उत्पन्न वाढेल”.

पालिकेकडून सहा महिन्याचा मालमत्ता कर माफीचा प्रस्ताव पण राज्य सरकारची मान्यता मिळणे अशक्य!

कोरोना महामारीत आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सहा महिन्यांचा मालमत्ता कर माफ करण्याचा ठराव केला आहे. शहरवासियांना दिलासा देण्यासाठी महापालिका सभेत शहरातील निवासी, व्यावसायिक, औद्योगिक अशा सर्व मालमत्तांवर आकारण्यात येणारा सहा महिन्यांचा मालमत्ताकर माफ करण्यास उपसूचनेद्वारे मंजुरी देण्यात आली.

याबाबतचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. परंतु, राज्य सरकारची देखील आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून त्याला अंतिम मान्यता मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.