Pimpri News: महापालिकेची गुरुवारी महापौर कक्षातून ऑनलाइन महासभा; गटनेते दालनातून सहभागी होणार

महापालिका भवनातील सभागृहास टाळे; चर्चा टाळण्यासाठी ऑनलाइन महासभा?

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका भवनातील यशवंतराव चव्हाण सभागृह बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मे महिन्यातील सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि.20) महापौर कक्षातून ऑनलाइन होणार आहे. या सभेसाठी पदाधिकारी, गटनेत्यांनी त्यांच्या केबिनमधून तर, नगरसेवकांनी क्षेत्रीय कार्यालय किंवा आपल्या घरुन ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’व्दारे सभेत सहभागी व्हावे, अशा सूचना दिल्या आहेत. संसर्ग काळात सभागृहात होणारा गोंधळ आणि चर्चेला लगाम लावावा म्हणून महापौरांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यातील सर्व महापालिकांच्या सर्वसाधारण सभा, विषय समिती सभा ऑनलाइन घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. महापालिका अधिनियमानूसार तीन महिन्यात सर्वसाधारण सभा न झाल्यास नगरसेवक पद रद्दची तरतूद आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यात येत आहेत. यापूर्वी महापौर, आयुक्त, नगरसचिव, पदाधिकारी आणि गटनेते सभागृहात तर, उर्वरित नगरसेवक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे आपल्या घरुन सभेत सहभागी होत होते.राज्यात कोरोनाचा धोका सर्वाधिक वाढला आहे. अनेकांना कोरोनाचे संक्रमण होत आहे.

कोरोना संकट गडद झाले आहे. राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास बंदी आहे.याकरिता महापालिका भवनातील यशवंतराव चव्हाण सभागृह बंद ठेवून महापौर आपल्या दालनातून सभा ऑनलाइन घेणार आहेत. तर, पदाधिकारी आपल्या दालनात बसून ऑनलाइन सहभागी होणार आहेत.गेल्या महिन्यात झालेल्या सभेत नगरसेवकांची कोरोना काळातील वैद्यकीय त्रृटींवर चर्चा करुन सभागृहाचे कामकाज लांबविले. त्यामुळे महापौरांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

दहा मिनिटे अगोदर मिळणार सभेची लिंक!
राज्य सरकारच्या आदेशानुसार ऑनलाइन सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. महापौर दालनात बसून महापौर उषा ढोरे सभा घेणार आहेत.पदाधिकारी आणि गटनेते हे त्यांच्या दालनातून , नगरसेवकांना ‘गुगल मिट’ च्या लिंकद्वारे सभेत सहभागी होतील. सभा सुरु होण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर लिंक अ‍ॅक्टिव्ह करण्यात येणार आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.