Pimpri news: ‘महापालिकेचा भांडार व शिक्षण विभाग भ्रष्टाचाराचे कुरण’ – दीपक खैरनार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागाकडून निरनिराळ्या योजना आखून त्या माध्यमातून करोडो रुपयांची करण्यात येणारी उधळपट्टी चुकीची आहे. शहरातील करदात्या नागरिकांच्या कररुपी पैशांचा शहर विकासासाठी योग्य रितीने वापर व्हावा. ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. कोणाच्या तरी आर्थिक हितासाठी घेण्यात येणारे निर्णय म्हणजे महापालिकेचा “भांडार विभाग” हा भ्रष्टाचाराचे कुरण बनत चालल्याचे दिसून येत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी केला आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात खैरनार यांनी म्हटले आहे की, संपूर्ण जग कोरोना संकटाशी झुंजत आहे. आपत्कालीन ओढवलेल्या या परिस्थितीमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे भांडार विभागाने सगळे काही ठप्प असताना, तसेच शाळा कॉलेजेस बंद असताना देखील खरेदीचा सपाटा लावला आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाने बालवर्गासाठी टेबल-खुर्च्या यांची मागणी ही 14 फेब्रुवारी 2019 साली भांडार विभागाकडे केली होती.

शिक्षण विभागाच्या मागणी नुसार भांडार विभागाच्या वतीने जून 2020 मध्ये ही खरेदी करण्यात आली. या खरेदीच्या दोन महिन्यापूर्वी म्हणजेच मार्च महिन्यात कोरोना संदर्भात लॉकडाऊन करण्यात आला होता, सदर खरेदी ही तातडीने थांबविता आली असती व महापालिकेचा पैसा वाचविता आला असता. परंतू तशी कोणतीही हालचाल शिक्षण विभाग व भांडार विभागाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार म्हणजे “उंदराला मांजर साक्ष” असाच आहे.

यात भांडार विभाग सहित शिक्षण विभागातील अधिकारी ही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.ही खरेदी खरेच बालवर्गासाठी होती की ठेकेदार/अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी होती? असा सवाल उपस्थित होत आहे. सदरील प्रक्रीया संशयास्पद असून यात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे महापालिकेच्या तिजोरीला थोडं थोडकं नाही तर, तब्बल 1 कोटी 87 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करण्यात यावी. संबंधित अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.