Pimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार

एमपीसी न्यूज – अण्णासाहेब मगर क्रीडासंकुलातील जम्बो कोविड सेंटरमध्ये महापालिका सेवेतील आठ डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले आहे. जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी आलेल्या रुग्णांची प्राथमिक तपासणी हे डॉक्टर्स करणार आहेत. तसेच, रुग्णांवर कोठे उपचार करायचे, याचा निर्णय हे डॉक्टर्स घेणार आहेत. त्यामुळे जम्बो कोविड सेंटरवरील ताण कमी होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये कोरोना विषाणुचा संसर्ग आणि प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि संक्रमण रोखण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जम्बो कोविड सेंटर स्थापन करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये कोरोना आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध असल्याने रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तसेच तेथे अन्य रुग्णालयांकडून रुग्ण पाठविण्याचे प्रमाण देखील जास्त असल्याने जम्बो कोविड सेंटर वरील रुग्णांचा अतिरिक्त ताण वाढत आहे. हा ताण कमी करण्यासाठी रुग्णांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

हे वर्गीकरण करण्यासाठी जम्बो कोविड सेंटरमध्ये तातडीक सेवा कक्ष (ट्रायज एरिया) स्थापन करण्यात आलेला आहे. याठिकाणी प्रथमत: रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याची डॉक्टरांमार्फत तपासणी हाईल. तपासणी झाल्यानंतर रुग्ण वैद्यकीय दृष्या किती गंभीर आहे याची खातरजमा करुन त्या रुग्णास जम्बो कोविड सेंटर येथे दाखल करुन घेण्याची खरोखरच आवश्यकता आहे का? ही बाब तपासावी अथवा रुग्णास अन्य रुग्णालयात पाठविता येईल काय? याबाबत निर्णय घेण्यात येईल.

हे कामकाज पाहण्याकरिता डॉ. किशोर मुरकुने, डॉ. शिवसागर जाधव, डॉ.पृथ्वी पटेल, डॉ. मोइन, डॉ. अक्षय म्हसे, डॉ. अभिषेक शिंदे, डॉ. प्रकाश कोयदे, डॉ. इनायत शेरकर यांची नेमणुक करण्यात आली आहे. हे कामकाज कान – नाक – घसा तज्ज्ञ डॉ. सुनिल पवार, वैद्यकीय अधिकारी शगुन पिसे, सहायक प्राध्यापक अतुल देसले, सहयोगी प्राध्यापक अस्थिरोग चिकित्सा डॉ.रितेश पाठक, सहायक प्राध्यापक नेत्ररोग चिकित्सा डॉ.महेश ठिकेकर यांच्या नियंत्रणाखाली करावयाचे आहे. कामकाज नियंत्रण प्रमुख सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर हे असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.