Pimpri News: जामीन अर्ज फेटाळल्यापासून महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांचा थांगपत्ता लागेना !

आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना कोणतीही कल्पना न देता शिक्षणाधिकारी गायब

एमपीसी न्यूज – शिक्षक भरती घोटाळ्यात आरोपी असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे सात दिवसांपासून गायब आहेत. या घोटाळ्याप्रकरणात जिल्हा सत्र न्यायाल्याने जामीन अर्ज फेटाळळ्यापासून शिंदे यांचा थांगपत्ता लागेनासा झाला आहे. सात दिवसांपासून त्या महापालिकेत येत नसून आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, प्रशासन विभागाला याबाबत कोणताही माहिती नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुणे जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या शिक्षक भरती घोटाळ्यातील सहभागी मुख्य सूत्रधार संभाजी शिरसाट आणि सर्व अधिकारी, संस्था चालक आणि शिक्षक यांचे जामीन अर्ज बुधवारी (दि. 27) पुण्यातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी फेटाळले आहेत. आरोपींमध्ये महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांचाही समावेश आहे.

ज्योस्त्ना शिंदे यांनी मुख्य सूत्रधार संभाजी शिरसाट यांच्याशी संगनमत करून खोट्या व बनावट शिक्षकांना गुन्हा दाखल झाल्यानंतरही मान्यता देण्यात आल्या. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यातील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी पुन्हा फेरमान्यता दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांचा जामीन अर्जही सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

प्रशासन अधिकारी ज्योस्त्ना शिंदे या शुक्रवार (दि.22) पासून महापालिका कार्यालयात येत नाहीत. याबाबतची कोणतीही माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली नाही. आयुक्त, अतिरिक्त कार्यालयाकडे, प्रशासन विभागाकडे त्यांचा रजेचा अर्ज देखील नाही. तसेच त्यांचा मोबाईल फोनही लागत नाही. जबाबदार अधिकारी काहीही न सांगता गैरजहर कसा राहू शकतो, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

याबाबत त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. त्यांचा मोबाईल फोन बंद आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.