Pimpri News: महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले! एक सदस्यीय प्रभाग पद्धत, कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी आज (बुधवारी) महापालिका आयुक्तांना दिले.

शुक्रवारपासून आराखडा तयार करण्याचे प्रत्यक्ष काम सुरु होणार आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार आहे. 2011 च्या जनगणेनुसार आराखडा तयार केला जाणार असून शहराची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 आहे. त्यापैकी 11 लाख 92 हजार 89 मतदार आहेत.

सन 2022 मध्ये मुदती संपणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांकरिता प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे शुक्रवार (दि.27) पासून सुरु होणार आहे. महापालिकांची व्यापकता विचारात घेता प्रभाग रचना वेळेवर अंतिम करणे सुकर व्हावे. त्यासाठी प्रारुप प्रभाग रचनेची कार्यवाही सुरु करणे आवश्यक आहे. शासनाने 31 डिसेंबर 2019 च्या निर्णयानुसार सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग एक सदस्याचा असेल. नव्या प्रभाग रचनेसाठी 2011 ची लोकसंख्या विचारात घेण्यात यावी. त्यानुसार प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा.

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार करावयाची कार्यवाही ही आरक्षणासंदर्भात असल्याने प्रारुप प्रभाग प्रसिद्धी व आरक्षण सोडत कार्यक्रमामध्ये त्याबाबतच्या सूचना देण्यात येतील. निवडणुक आयोगाचे निकषाचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग रचना नियमातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. महापालिका हद्दीत झालेले बदल (क्षेत्र समाविष्ट करणे अथवा वगळणे), विकासाच्या योजनांमुळे झालेले भौगौलिक बदल त्यात नवीन रस्ते, पुल, इमारती इत्यादी विचारात घेण्यात यावे.

प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीच्या कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी विचारात घेता, निवडणुकात मुदत समाप्तीपूर्वी पार पाडणे शक्य व्हावे. यासाठी सध्या प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा. आराखडा तयार करण्याची कार्यवाही शुक्रवारपासून सुरु होणार आहे. आराखडा तयार होताच आयोगाला तत्काळ ई-मेलद्वारे अवगत करावे. जेणेकरुन महापालिकानिहाय पुढील कार्यवाही सुरु करता येईल. प्रभाग रचना करताना त्याची गोपनियता न राखणे, नियमांचे काटेकोर पालन न होणे, प्रारुप प्रभाग रचनेविरुद्ध वाढणा-या हरकतींची संख्या, अंतिम प्रभाग रचनेविरुद्ध दाखल होणाऱ्या वाढत्या रिट याचिकांची संख्या व त्यामुळे उद्भवणारे न्यायालयीन प्रकरणे आणि यामुळे होणारा विलंब टाळणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

शहरात 11 लाख 92 हजार 89 मतदार
सन 2011 च्या जनगणनेनुसार पिंपरी-चिंचवड शहराची एकूण लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 आहे. त्यात अनुसुचित जातीचे 2 लाख 73 हजार 810 आणि अनुसुचित जमातीचे 36 हजार 535 नागरिक आहेत. 17 लाखांपैकी 11 लाख 92 हजार 89 मतदार आहेत. त्यामध्ये 6 लाख 40 हजार 696 पुरुष, 5 लाख 51 हजार 362 महिला आणि इतर 31 मतदार आहेत.

निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर म्हणाले, ”आगामी निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश आले आहेत. शुक्रवारपासून त्याचे काम सुरु होईल. महापालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत त्याचे काम केले जाणार आहे. आराखड्याचे काम कधीपर्यंत पूर्ण करायचे आहे. याबाबत स्पष्टता झालेली नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.