Pimpri News: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या वारसाला मिळणार 25 लाख रुपये

स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे निधन झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांच्या वारसास प्रत्येकी 25 लाख रुपये देण्यात येणार आहेत. 13 कर्मचा-यांच्या वारसास सुरक्षा कवच योजनेनुसार 25 लाख रुपये अदा करण्यासाठी येणा-या 3 कोटी 25 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने आज (बुधवारी) मान्यता दिली. दरम्यान, कोरोनामुळे महापालिकेच्या 23 कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना उपाय योजनेकामी कार्यरत महापालिका अधिकारी, कर्मचारी, महापालिकेकरीता सेवा देणारे कर्मचारी, कंत्राटी, बाह्यस्त्रोताद्वारे घेतलेले रोजंदारी, मानधनावरील नियुक्त केलेले कामगार यांचे कोरोनामुळे निधन झाल्यास त्यांच्या वारसांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

त्याबाबतचा निर्णय 9 जुलै 2020 रोजी घेण्यात आला. विमा सुरक्षा कवचनुसार केंद्र, राज्य सरकारकडून 50 लाख आणि महापालिकेकडून अनुकंपा तत्वावर नियुक्ती आणि 25 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

संबंधित वारसाने अनुकंपा नियुक्तीचा विकल्प न स्वीकारल्यास त्यांना महापालिकेतर्फे अतिरिक्त 25 लाख रुपये देण्यात येणार आहे. महापालिकेकडून दिल्या जाणा-या अर्थसहाय्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली आहे. याबाबतच्या धोरणाला महासभेने 26 ऑगस्ट 2020 रोजी मान्यता दिली आहे.

त्यानुसार कामगार कल्याण विभागाकडे संबंधित विभागप्रमुखांच्या शिफारशीसह प्राप्त झालेली 13 प्रकरणे सर्व कागदपत्रांसह समितीपुढे सादर केली होती. कागदपत्रांची तपासणी करुन सर्व संबंधित कर्मचा-यांच्या वारसास मंजूर धोरणानुसार कोरोना विषाणू-सुरक्षा कवच योजनेनुसार महापालिकेकडून प्रत्येकी 25 लाख रुपये अदा करण्यास 19 मार्च 2021 रोजीच्या समितीच्या बैठकीत मान्यता दिली आहे.

कोरोनामुळे निधन झालेल्या 13 कर्मचा-यांच्या वारसास कोरोना विषाणू सुरक्षा कवच योजनेनुसार 25 लाख रुपये अदा करण्यासाठी येणा-या 3 कोटी 25 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. तसेच भविष्यात या प्रकारच्या प्रकरणांना कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर समितीच्या मान्यतेने मंजूर धोरणानुसार कामगारांच्या वारसास देण्यास, त्यासाठी येणा-या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले, ”कोरोना कालावधीत काम करत असताना महापालिकेच्या 23 कर्मचा-यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यापैकी 13 कर्मचा-यांच्या वारसांच्या कागदपत्रांची पूर्तता झाली आहे. त्यांना 25 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तर, सात कर्मचा-यांच्या वारसांची कागदपत्रे तयार आहेत. त्यांनाही लवकरच मदत केली जाईल. तीन जणांचे कागदपत्रे तयार नाहीत. त्यांची कागदपत्रे तयार झाल्यास त्यांनाही अर्थसहाय्य केले जाणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.