Pimpri News: महापालिका स्थायी समितीची 98 कोटींच्या विकासकामांना मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. यासाठी आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समिती सभेत 98 कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली.

सेक्टर क्रमांक 22 येथील जलशुध्दीकरण केंद्रामध्ये विविध युनिटसची स्ट्रक्चरल ऑडीटच्या अहवालानुसार देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे.

यासाठी 3 कोटी 60 लाख रुपये, महापालिकेच्या वतीने करण्यात येणा-या ब, ह आणि फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मलनि:सारण नलिका, मॅनहोल चेंबर्सची साफसफाई आधुनिक यांत्रिकी पध्दतीने करण्यासाठी 3 कोटी 87 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 18 मधील डीपी रस्ते विकसित करण्यासाठी 2 कोटी 96 लाख रूपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.

महापालिकेच्या अ,ब,ड,ग,ह क्षेत्रीय कार्यालयातील आणि देहू आळंदी रस्त्यामधील तसेच पुणे मुंबई हमरस्ता निगडी ते दापोडी दरम्यान मध्य दुभाजक सुशोभिकरण देखभालीसाठी 3 कोटी 79 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

डांगे चौक ते जगताप डेअरी येथील साई चौक या बीआरटी रस्त्याचे सुशोभिकरण देखभालीसाठी 18 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. महापालिका क्षेत्रातील विविध उद्यानांच्या देखभाल व संरक्षणासाठी 3 कोटी 64 लाख रुपये खर्च होणार आहेत. या खर्चासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या अ,ब,फ आणि ग प्रभागातील मैला शुध्दीकरण केंद्र तसेच मैला पाणी पंप हाऊसच्या इमारतीवर 57 लाख रुपये खर्च करून सोलर सिस्टीम बसविण्यात येणार आहे.

निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील क्लॅरीफॉक्यू लेटर ब्रिजची रोटेटिंग असेम्बली बदलण्यात येणार आहेत यासाठी 96 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. यासह सुमारे 18 कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चास देखील बैठकीत मान्यता देण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.