Pimpri News : ‘मेट्रोच्या पीलरवर संतांचे म्युरल आणि अभंग लावावेत’

महाराष्ट्र वारकरी महामंडळाची महापौर माई ढोरे यांच्याकडे मागणी

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून जाणाऱ्या मेट्रोच्या सिमेंट पीलरवर सर्व संतांचे म्युरल आणि अभंग लावण्याची मागणी महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्यावतीने महापौर माई ढोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शहरातील तिनही आमदार व दोन्ही खासदार यांच्याकडेही देण्यात आले आहे.

महाराष्ट्र वारकरी महामंडळ पिंपरी चिंचवड अध्यक्ष विजू जगताप, हभप चंद्रकांत महाराज वांजळे, हभप सतीश महाराज काळजे, नगरसेवक सुरेश भोईर, माजी नगरसेवक आप्पा बागल, विठ्ठल रुक्मिणी वारकरी मंडळ पिंपळे सौदागरचे माजी अध्यक्ष संजय भिसे, हभप तानाजी काळभोर, हभप वसंत कलाटे, विकास काटे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, शहरात नियोजित मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सिमेंट पिलरवर सर्व संताचे म्युरल आणि अभंग लाववावेत. मेट्रो मार्गाला पालखी सोहळयाचे जनक ‘तपोनिधी श्री नारायण महाराज, सदगुरू श्री हैबतराव बाबा आरफळकर सेतू ‘ असे नामकरण करावे.

वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वानंद सुखनिवासी श्री जोगमहाराज (सदगुरू श्री विष्णुबुवा जोग) हे पैलवान होते . त्यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या पिंपरी गावातील वाड्याला निलफलक लावणे तसेच पिंपरी गाव येथे त्यांचा पुतळा तसेच प्रवेशव्दार उभारण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

महापालिका दरवर्षी अनेक महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. त्याचप्रमणे दरवर्षी “वारकरी संमेलन / अखंड हरिनाम सप्ताह यांचेही आयोजन करावे. संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल मंदीर येथे होत असतो. वाढत्या शहरीकरण व नागरीकरणामुळे पालखीतील दिंड्या, वारकरी व फडकरी मंडळी यांना निवासाकरिता जागेची अडचण भेडसावत आहे.

त्यामुळे आकुडी येथील पेठ क्रमांक 28  शेजारी महापालिका करसंकलन विभागाच्या इमारतीवर संत नामदेव महाराज वारकरी भवन उभारण्यात यावे. यासाठी उचित कार्यवाही करावी. या इमारतीत पालखी मुक्कामाच्या दिवशी दिंडी, फडकरी, वारकरी विशेषतः महिला दिंड्यांच्या निवासाची व्यवस्था होऊ शकते. याबाबतचा ठराव अ प्रभाग समितीमध्ये सन 2002 ते 2007 या काळात संमत झाला असल्याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.