रविवार, सप्टेंबर 25, 2022

Pimpri News : संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांना आशा भोसले पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने भारतातील लक्षणीय संगीतकार आणि गायकास दिला जाणारा आशा भोसले पुरस्कार यंदा प्रसिद्ध संगीतकार, दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी आज (दि.04) पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुरस्काराबद्दल माहिती देताना नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे सिद्धी विनायक ग्रुप पुरस्कृत भारतीय संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारा संगीतकार आणि गायकास प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो. प्रसिद्ध गायिका गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 2002 पासून स्वरसम्राज्ञी आशा भोसले पुरस्कार दिला जातो.

गेल्यावर्षी कोरोनामुळे पुरस्कार वितरण सोहळा झाला नाही. 2020 चा पुरस्कार कोरोनाचे नियम पाळून लवकरच घेण्याचे नियोजन आहे. एकोणीसावा पुरस्कार डॉ. सलील कुलकर्णी यांना जाहीर करताना परिषदेला आनंद होत आहे. 1 लाख 11 हजार रुपये रोख, शाल व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे अठरावे वर्ष आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

पुरस्काराचे आजवरचे मानकरी

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लहरी, प्यारेलाल, आनंदजी, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, गायक अनु मलिक, शंकर महादेवन, शास्त्रीय गायक पंडित शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन व सोनू निगम, सुनिधी चौहान, पार्श्वगायक पद्म भूषण उदित नारायण, सुप्रसिध्द गायक रूपकुमार राठोड, अवधूत गुप्ते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

spot_img
Latest news
Related news