Pimpri News : मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज घरीच अदा करावी; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे 21 जुलै रोजी होणा-या बकरी ईदची नमाज मस्जिद, ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी न करता नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी नवीन नियमावलीचे पत्रक जारी केले आहे.

कोरोनाचा धोका कायम असल्याने तसेच डेल्टा, डेल्टा प्लस व्हेरियंट हा कोरोनाचा नवीन प्रकार राज्यातील काही जिल्ह्यामध्ये आढळून आला आहे. त्याचा प्रसार होत असून लवकरच मोठ्या भौगोलिक क्षेत्रावर अधिक घातक रुपात कोरोनाची तिसरी लाट पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सामान्यत: आणखी कठोर निर्बंध लागू करण्याचे सरकारचे निर्देश आहेत.

स्पर्धा परीक्षा केंद्र, खासगी क्लासेस हे सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी सात वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था 31 जुलैपर्यंत बंद राहतील. मात्र, ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील. राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे 21 जुलै रोजी होणा-या बकरी ईदची नमाज मस्जिद, ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी न करता नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी. सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांनी जनावरे खरेदी करावयाची असल्यास ऑनलाईन पद्धतीने अथवा दुरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावीत.

नागरिकांनी शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करावी. वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही. बकरी ईदच्या निमित्त नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये, एकत्र जमू नये. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त पाटील यांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.