Pimpri News : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणाची जबाबदारी आशा, अंगणवाडी सेविकांच्या खांद्यावर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राबविण्यात येत असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी 182 आशा स्वंयसेविका आणि 314 अंगणवाडी सेविका अशा एकूण 496 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना प्रतिदिन 450 रुपये भत्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी 55 लाख 80 हजार रुपये खर्च होणार आहे.

राज्य सरकारने 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम हाती घेतली आहे. कोरोना नियंत्रण आणण्यासाठी घरोघरी भेटी देऊन आरोग्य तपासणी व जनजागृती केली जात आहे. संशयित कोरोना रुग्ण शोधणे, तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार असलेल्या व्यक्तींना शोधण्याचे काम मोहिमेत केले जाते. याशिवाय बालकांचे लसीकरण करणे. गरोदर मातांवर वेळीच उपचार या बाबींचाही समावेश आहे. ही मोहीम पहिल्या फेरीत 15 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर आणि दुसऱ्या फेरीमध्ये 14 ते 24 ऑक्‍टोबर या कालावधीत होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पहिल्या फेरीमधील 15 दिवसांमध्ये 54 हजार 575 घरांना भेटी देणे आवश्‍यक आहे. दैनंदिन एका पथकाने 35 घरभेटी याप्रमाणे एकूण 1 हजार 559 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी, वॉर्डनिहाय एक स्थानिक नागरिक त्यामध्ये एक पुरुष आणि एक महिला अशा तीन व्यक्तींचा समावेश असणार आहे.

यामध्ये आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा समावेश करण्यात आला आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी 182 आशा स्वंयसेविका आणि 314 अंगणवाडी सेविकांना सामावून घेण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.