Pimpri News : “नारायण सुर्वे यांची कविता चिरंतन!” – प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस

एमपीसी न्यूज – “जोपर्यंत मराठी माणूस जिवंत आहे, तोपर्यंत नारायण सुर्वे यांची कविता चिरंतन राहील!” असे विचार पिंपरी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी (दि. 8) पद्मश्री नारायण सुर्वे यांनी वास्तव्य केलेल्या नेरळ (तालुका कर्जत) येथील घराचे स्मारकात रूपांतर झालेल्या कवितेच्या विद्यापीठातील काव्यजागर संमेलनाचे उद्घाटन करताना मांडले.

पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित विशेष कार्यक्रमात प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, कृष्णाबाई नारायण सुर्वे, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद भोसरी शाखाध्यक्ष मुकुंद आवटे, लायन्स क्लब भोजापूर गोल्डचे अध्यक्ष अरुण इंगळे, दिनेश औटी यांची प्रमुख उपस्थिती होती.

नारायण सुर्वे लिखित “ऐसा गा मी ब्रह्म…” या सुप्रसिद्ध कवितेच्या राजेंद्र वाघ यांनी केलेल्या गायनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विश्वास वसेकर (नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान), ज्येष्ठ उद्योजक रंगनाथ गोडगे-पाटील (नारायण सुर्वे श्रमउद्योग पुरस्कार), कष्टकरी नेते काशिनाथ नखाते (नारायण सुर्वे श्रमप्रतिष्ठा पुरस्कार), नांदेड येथील देवीदास फुलारी (कुसुमाग्रज काव्यप्रतिभा पुरस्कार), लोणार येथील डॉ. विशाल इंगोले आणि पैठण येथील संदीप जगदाळे (नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

उद्धव कानडे, भरत दौंडकर, प्रा. दिगंबर ढोकले यांच्या निवड समितीने पुरस्कारार्थींची निवड केली होती. त्यानंतर ‘आम्ही नारायण सुर्वे यांचे वारसदार’ या कविसंमेलनात ललिता सबनीस, नीलेश म्हसाये, प्रदीप गांधलीकर, सुहास घुमरे, हृदयमानव अशोक, सारिका माकोडे, सुरेश कंक, संगीता झिंजुरके यांच्या कवितांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

जीवनगौरव सन्मानाचे मानकरी प्रा. विश्वास वसेकर यांनी, “मला माणूस आणि कवी म्हणून घडायला सुर्वे यांची कविता कारणीभूत ठरली!” अशी भावना व्यक्त केली.

प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, “प्रा. नरहर कुरुंदकर, कुसुमाग्रज अन् सुर्वेमास्तर यांचा भावनिक अनुबंध होता. कवितेच्या माध्यमातून सुर्वेमास्तरांनी मराठी माणसे जोडली. खरी संस्कृती ही श्रमाधिष्ठित असल्याने सुर्वे यांचे हे कवितेचे विद्यापीठ श्रमिकांचे विद्यापीठ झाले आहे. नारायण सुर्वे हे दुसरे केशवसुत होते!”

प्रा. मिलिंद जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “मराठी कवितेला प्रेमाचा गंध होता; पण तिला श्रमाचा सुगंध देण्याचे महत्त्वाचे कार्य नारायण सुर्वे यांच्या कवितेने केले. अजूनही कष्टकऱ्यांच्या व्यथा, वेदना संपलेल्या नाहीत. सत्याचा शोध घेणे आणि त्याचा आवाज बुलंद करणे हे प्रतिभावंतांचे काम असते म्हणून तो वारसा कवींनी चालवावा!” असे आवाहन केले.

पुरुषोत्तम सदाफुले, कल्पना सुर्वे-घारे, गणेश घारे, जयवंत भोसले, अरुण गराडे, रोहित खर्गे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले; तर बाजीराव सातपुते यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.