Pimpri News: नार्को टेस्ट! आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे दोघेही होते स्थायी समितीचे अध्यक्ष – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या लाच प्रकरणानंतर सत्ताधारी भाजप आणि विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. सत्तारुढ पक्षनेत्यांनी आजपर्यंतच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या नार्को टेस्टची मागणी केल्यानंतर शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी भाजप आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे दोघेही स्थायी समितीचे अध्यक्ष होते याची पक्षनेत्यांना आठवण करुन दिली.

स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यावरील कारवाईचे राजकीय षडयंत्र आहे. चौकशीच करायची असेल तर महापालिकेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंतच्या सर्वच अध्यक्षांची नार्को टेस्ट करावी. त्यात खरं काय ते जगासमोर नक्कीच येईल, अशी मागणी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली होती.

त्यावर आता शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी प्रतिक्रिया दिली. कलाटे म्हणाले, ”सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांचे दोनही नेते, शहराचा गाढा हाकणारे चिंचवडचे आमदार लक्ष्मणराव जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे हे दोघेही स्थायी समितीचे अध्यक्ष होते. पक्षनेते ढाके हे कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया चिंचवडला विचारल्याशिवाय देत नाहीत. ही प्रतिक्रिया चिंचवडला विचारुनच दिली असेल की भाऊ मी नार्को तुमच्यापासूनच सुरु करु का?”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.