Pimpri News: ‘लसीकरण केंद्रावर ‘एनसीसी’ कॅडेट, होमगार्डची सुरक्षा ठेवा’

उपमहापौर हिराबाई घुले यांची आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधक लशींच्या तुटवड्यामुळे प्रशासनाला विविध अडचणींना, समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लसीकरण केंद्रांवर नागरिक डॉक्टरांशी हुज्जत घालतात. आप-आपसातही नागरिकांचे वाद होतात. कोरोना नियमांचेही पालन होत नाही. वाद टाळण्यासाठी, कोरोना नियमांचे पालन व्हावे आणि लसीकरण सुरळीत होण्याठी शहरातील सर्वच लसीकरण केंद्रांवर एनसीसी कॅडेटच्या स्वयंसेवकाची किंवा ‘होमगार्ड’ची नियुक्ती करावी, अशी मागणी उपमहापौर हिराबाई घुले यांनी पालिका प्रशासनाला केली आहे.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की, कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. प्रशासन लसीकरणासाठी झोकून देऊन काम करत आहे. सध्या लशींचा तुटवडा जाणवत आहे. लसीकरणासाठी पहाटेपासूनच केंद्रांबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. एका केंद्रांवर केवळ 100 लशींचे डोस उपलब्ध असतात.

रांगेत थांबूनही लस मिळत नसल्याने नागरिक संतप्त होतात अन् अनेकदा वादावादीचे प्रकार घडतात. डॉक्टरांशी वादावादी होते. नागरिक आप-आपसात भांडतात. नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी वेळप्रसंगी पोलिसांनाही पाचारण करावे लागते. पोलीस येण्यासाठी विलंब लागतो. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

महापालिकेच्या काही लसीकरण केंद्रांवर एनसीसी कॅडेट स्वयंसेवक नियुक्त केले आहेत. परंतु, सर्वंच केंद्रांवर स्वयंसेवक नियुक्त केले नाहीत. महापालिकेच्या कोविड लसीकरण केंद्रांवर नागरिकांची वाढती संख्या पाहता. तसेच कोरोना संबंधित नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी.

यासाठी केंद्रांवर अधिक मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली. त्यासाठी पुणे येथील एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरकडे उपलब्ध असल्यास एनसीसी कॅडेट स्वयंसेवक वाढून घ्यावेत. केंद्रांवरील वाद टाळण्यासाठी, सुरक्षित लसीकरण होण्यासाठी पालिकेच्या सर्वंच लसीकरण केंद्रांवर एनसीसी कॅडेट स्वयंसेवकांची किंवा होमगार्डची नियुक्ती करावी. जेणेकरुन लसीकरण केंद्रांवरील वाढ टाळता येतील. नागरिकांचे सुरळीत लसीकरण होईल, असे उपमहापौर घुले यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.