Pimpri News: आमदार महेश लांडगे यांच्या शब्दाला राष्ट्रवादीचा मान, उपमहापौरपदी केशव घोळवे बिनविरोध

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आणि अन्य यंत्रणा कामी लावणे योग्य होणार नाही. भाजपाचे सभागृहात बहुमत आहे. अशा परिस्थितीत उपमहापौरपदाची निवडणूक लढवण्यात काहीही हासील होणार नाही असे सांगत भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीला निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. लांडगे यांच्या विनंतीला प्रतिसाद देत राष्ट्रवादीने निवडणुकीतून माघार घेतली. भाजपचे केशव घोळवे यांची उपमहापौरपद बिनविरोध निवड झाली आहे.

उपमहापौर निवडणुकीसाठी पीठासिन अधिकारी कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आज (शुक्रवारी) ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निकिता कदम यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, कदम यांनी मुदतीत माघार घेतल्याने घोळवे बिनविरोध उपमहापौर झाले.

…अन् भाजप शहराध्यक्ष विरोधी पक्षनेत्याच्या दालनात

उपमहापौर तुषार हिंगे यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर उपमहापौर कोण याबाबत चर्चांना उधाण आले होते. दोन्ही आमदार समर्थकांमध्ये केशव घोळवे यांना संधी दिल्यामुळे काहीसा नाराजीचा सूर होता. मात्र, शुक्रवारी सकाळी शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे महापालिका भवनात दाखल झाले. यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके आणि संबंधित पदाधिकाऱ्यांसोबत प्राथमिक चर्चा केली.

त्यानंतर लांडगे यांनी थेट विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या दालनात धडक दिली. कोरोनाच्या पार्श्वभूवीर तसेच भाजपाला बहुमत असताना निवडणूक यंत्रणा कामाला लावणे योग्य होणार नाही, अशी विनंती केली. यानंतर विरोधी पक्षनेते राजू मिसाळ आणि नगरसेविका मंगला कदम यांनी आमदार लांडगे यांच्या विनंतीला मान देत उपमहापौर निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.