_MPC_DIR_MPU_III

Pimpri news: महापालिकेतील वाढता भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार मोडीत काढण्याचे नवनियुक्त आयुक्तांसमोर आव्हान!

एमपीसी न्यूज (गणेश यादव) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विकास कामातील होणारी ठेकेदारांची रिंग, ठेकेदारांनी महापालिकेला दिलेला बोगस ‘एफडीआर’, एकही रुग्ण नसताना ‘सीसीसी’ सेंटर्सला दिला जाणारा कोट्यवधी रुपयांचा मोबदला, कचरा वाहतूक व संकलनातील गोलमाल, ही महापालिका कारभारातील गेल्या महिन्याभरातील प्रातिनिधीक उदाहरणे…!नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांच्यासमोर महापालिकेतील वाढता भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार, स्मार्ट सिटीतील गडबड, घोटाळे मोडीत काढण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यातच आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आयुक्तांना ‘तारेवरची’ कसरत करावी लागणार आहे.

_MPC_DIR_MPU_IV

पिंपरी-चिंचवड शहरात मागील वर्षभरापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आंद्रा, भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पाला गती देवून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. अमृत योजना, चोवीस बाय सात, रस्ते गटार, भूमिगत गटारांची कामे शहरात सुरू आहेत. त्यासाठी सर्वत्र रस्ते खोदाई केली आहे. रस्ते खोदाईमुळे वाहतुकीस खोळंबा होत आहे. त्यामुळे खोदलेली कामे पूर्ण करुन रस्ते पूर्ववत करण्याचे आयुक्तांसमोर आव्हान असणार आहे.

निगडीतील सुरू असलेला भक्ती-शक्ती पूल, मुकाई चौकातील न्यायालयीन कचाट्यात अडकलेला पूल अशी प्रगतीपथावर असलेली कामे पूर्णत्वास नेण्याचे मोठे आव्हान आयुक्तांसमोर असणार आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला गती द्यावी लागणार आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम करावी लागणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

स्मार्ट सिटीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे गडबड, घोटाळे मोडीत काढण्याचे मोठे आव्हान असणार आहे. विकास कामातील ठेकेदारांची होणारी रिंग, अधिकाऱ्यांमधील राजकारण, बेबंदपणा, काही विभागातील अधिकाऱ्यांची झालेली मक्तेदारी मोडीत काढावी लागणार आहे.

मागील तीन दिवसांपासून पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. एकाही रुग्णावर उपचार केले नसताना कोरोना कोविड केअर सेंटरला दिली जाणारी कोट्यवधी रुपयांची वाढीव बिले, स्पर्श हॉस्पिटलला अदा केलेले तीन कोटी रुपये वसूल करण्याचे मोठे आव्हान आयुक्तांसमोर असणार आहे. कोरोना खरेदीतील अनागोंदी कारभार, भ्रष्टाचाराचे झालेल्या आरोपांचे मळभ आयुक्त कसे दूर करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहराची भौगोलिक आणि राजकीय माहिती जलदगतीने आयुक्तांना समजून घ्यावी लागणार आहे. शेवटचे वर्ष असल्याने आंदोलन, उपोषणे, आरोप-प्रत्यारोप वाढणार आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. तर, राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे आयुक्तांना तटस्थपणे निर्णय घेवून अंमलबजावणी करावी लागणार आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.