Pimpri News: शहरात तूर्तास लॉकडाउन, जनता कर्फ्यू नाही : महापौर ढोरे

नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, कोरोनाच्या नियमांचे पालन करावे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. नागरिकांनी गर्दी करणे टाळणे आवश्यक आहे. लॉकडाउन, जनता कर्फ्यूबाबत घाईगडबडीत निर्णय घेतला जाणार नाही. उद्याच्या शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू नसल्याचे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले. तसेच पुढील शनिवारी, रविवारी जनता कर्फ्यू करण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.

शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी करुन कोरोना नियमांचे उल्लंघन करु नये; अन्यथा शहराला लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापौर उषा ढोरे यांनी दिला होता. तसेच शनिवार, रविवारी जनता कर्फ्यू करण्याचे संकेत दिले होते.

याबाबत पत्रकारांनी विचारले असता महापौर उषा ढोरे म्हणाल्या , ”शहरातील नागरिकांनी गर्दी करु नये. कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. स्वयंशिस्त पाळावी. लॉकडाउन, जनता कर्फ्यूबाबत अचानक कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. नागरिकांचे हाल, नुकसान न करता निर्णय घेण्यात येईल. याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. उद्याच्या शनिवारी आणि रविवारी जनता ‘कर्फ्यू’ नाही”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.