Pimpri News : आरटीओची कागदपत्रे सोबत घेऊन फिरण्याची गरज नाही ! लायसन्ससह अन्य आवश्यक कागदपत्रे ठेवा मोबईलमध्ये

एमपीसी न्यूज – प्रादेशिक परिवहन कार्यालयाची कागदपत्रे सोबत घेऊन फिरण्याची गरज नाही. ही कागदपत्रे केंद्र सरकारच्या डिजिटल लॉकर किंवा राज्य सरकारच्या एम परिवहन या मोबईल ॲप्लिकेशनमध्ये डिजिटल स्वरुपात ठेवली तरी चालणार आहेत. आरटीओ किंवा पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केल्यास डिजिटलीस्वरूपात जतन केलेली कागदपत्रे दाखवली तरी चालणार आहे.

केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार 1 ऑक्टोबरपासून लायसन्स, आरसी, स्मार्ट कार्ड, पीयूसी, फिटनेस सर्टिफिकेट आदी कागदपत्रे डिजिटल फॉर्ममध्ये जवळ बाळगली तरी चालणार आहे. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारने पोलीस आणि आरटीओ अधिका-यांना सूचना दिल्या आहेत.

आजपर्यंत पोलिसांनी अडवल्यावर अथवा आरटीओ किंवा पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केल्यास मूळ कागदपत्रे दाखवण्याचे बंधन होते. मात्र, आता त्या बंधनातून सवलत देत आता डिजिटली कागदपत्रे ठेवली तरी चालणार आहे.

या अधिसूचनेमुळे वाहन चालकांना लायसन्स आणि आरसी बुकची मूळ प्रत सोबत बाळगण्याची आवश्यकता नाही. मोबईलमध्ये ही कागदपत्रे कायमस्वरूपी सुरक्षित राहू शकतात.

मोबईल हरवला तरी ही कागदपत्रे सुरक्षित राहणार आहेत. ही कागदपत्रे वाहन चालकांना हाताळण्यासाठी तसेच पोलीस व आरटीओ अधिका-यांना तपासणीसाठी देखील उपयुक्त ठरणार आहेत.

केंद्र सरकारने महत्वाची कागदपत्रे डिजिटली सुरक्षित ठेवण्यासाठी डिजिटल लॉकर नावाचे मोबईल ॲप्लिकेशन तयार केले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने एम परिवहन हे मोबईल ॲप्लिकेशन बनवले आहे. दोन्ही ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध असून ती हाताळण्यासाठी सोपी आहेत.

डिजिटल लॉकर तसेच एम परिवहन या ॲप्लिकेशनमध्ये कागदपत्रे डिजिटली ठेवता येत आहेत. पोलीस किंवा आरटीओ अधिका-यांनी त्याची मागणी केल्यास ती दाखवावी लागतील. डिजिटल स्वरूपातील कागदपत्रे संबंधित वाहन चालक दाखवू शकला नाही, तर मूळ कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. मूळ कागदपत्रे नसतील तर संबधित वाहन चालकावर कारवाई होणार आहे.

पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे म्हणाले, “महाराष्ट्र शासनाने यापूर्वी देखील डिजिटली कागदपत्रे ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यापूर्वीपासूनच डिजिटली कागदपत्रे असतील तरी आरटीओ विभागाकडून ती ग्राह्य धरली जात होती. आता आणखी सूचना आली आहे. त्यामुळे सर्व कागदपत्रे डिजिटली ठेवली तरी चालणार आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.