Pimpri News: जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्याची आवश्यकता नाही – आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी महापालिका रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये बेडची पुरेशी उपलब्धता आहे. त्यामुळे तूर्त जम्बो कोविड केअर सेंटर चालू करण्याची आवश्यकता नसल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. गेल्या अकरा महिन्यांत करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. परंतु, अचानक फेब्रुवारी 2021 मध्ये शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होवू लागली.

दिवसाला 800 च्या पटीत नवीन रुग्ण सापडू लागले. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होतच आहे. रुग्णवाढ थांबत नाही. आता वाढत असलेल्या अनेक रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. अनेक रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अनेक रुग्ण होम आयसोलेशनला पसंती देत आहेत.

दरम्यान, महापालिकेकडे बेडची उपलब्धता पुरेशी आहे. 15 हजार खाटा आहेत. त्यामुळे तूर्त जम्बो कोविड केअर सेंटर चालू करण्याची आवश्यकता नसल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले.

नेहरुनगर येथे पीएमआरडीएचे 816 खाटांचे आहे जम्बो कोविड केअर सेंटर
पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने पीएमआरडीएतर्फे पिंपरीतील नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे 816 बेडचे अद्ययावत जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. 1 सप्टेंबर 2020 पासून हे जम्बो कोविड केअर सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी सुरु झाले होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने 1 जानेवारी पासून जम्बो सेंटर बंद करण्यात आले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.