Pimpri News : रेमडेसिवीरचा अतिरेक नाही, गरजेनुसारच रुग्णांना डोस ; आरोग्यतज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे

एमपीसी न्यूज – ‘कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा अतिरेक वापर केला जात नाही. तर, आवश्यकतेनुसारच रुग्णांना हे इंजेक्शन दिले जाते. अचानक रुग्णांची संख्या वाढली आणि त्याप्रमाणात रुग्णांना द्यावे लागणा-या इंजेक्शनची मागणी देखील वाढली तसेच, त्या प्रमाणात उत्पादन आणि साठा नसल्याने इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला’, असे मत आरोग्य तज्ज्ञ व इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी मांडले.

देशासह महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत असून दररोज विक्रमी रुग्णांची नोंद होत आहे. महाराष्ट्रात दररोज साठ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत सर्वत्र बेड, इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा राज्यात निर्माण झाला असून, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत तर, राजकारण देखील तापलं आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा अतिरेक केला जात आहे का ? असा प्रश्न डॉ. अविनाश भोंडवे यांना विचारला असता ते म्हणाले, दहा टक्के कोरोना रुग्णांना या इंजेक्शनची गरज भासते. सुरुवातीला जेव्हा रुग्ण रुग्णालयात दाखल होतो तेव्हा ऑक्सिजन कमी पडल्याने त्यांना रेमडेसिवीर दिले जाते. त्यामुळे रुग्ण गंभीर होत नाही, पर्यायी प्रकृती सुधारण्यास मदत होते. रुग्णांची संख्या कमी होत गेली तशी इंजेक्शनची मागणी कमी झाली. फेब्रुवारी महिन्यात रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आणि आता तर, रुग्ण वाढीचे प्रमाण अत्याधिक आहे. त्यामुळे उत्पादन कमी झाले आणि पुरेसा साठा देखील उपलब्ध नाही त्यामुळे इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला’, असे भोंडवे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

डॉ. अविनाश भोंडवे पुढे म्हणाले, रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे रुग्णांमध्ये परिणाम चांगले दिसून येतात, मुळात हे प्राण वाचविणारे इंजेक्शन आहे. बारा वर्षांवरील व लिव्हर आणि किडनीचे आजार नसणाऱ्या रुग्णांना ते दिले जाते. पाच दिवसांचा ‌डोस रिकमन्ड केला जातो असे ते म्हणाले. ऑक्सिजनचा वापर देखील आवश्यकतेनुसार केला जातो. बऱ्याच वेळा रुग्णांच्या आरोग्य स्थितीवर ऑक्सिजनचा वापर अवलंबून असतो असं भोंडवे यांनी नमूद केले. रेमडेसिवीर वापरानंतर रुग्णांमध्ये दुष्परिणाम दिसून येतात या गैरसमजुतीचे देखील त्यांनी खंडन केले.

जागतिक आरोग्य संघटनेने रेमडेसिवीरच्या वापरामुळे मृत्यूदर कमी होत नसल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ‘भारतातील सर्व डॉक्टरांचा प्रत्यक्ष अनुभव बघितला तर, ते परिणाम कारक असल्याचे दिसून आले आहे. रेमडेसिवीर विषाणूची बेरीज होण्यास प्रतिबंध करते. डॉक्टरांचा प्रत्यक्ष अनुभव आणि माहिती हेच सांगते की, रमेडेसिवीरच्या वापरामुळे रुग्णांची प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सरकारने किंवा जागतिक आरोग्य संघटनेने देखील रेमडेसिवीरचा वापर करु नये असे म्हटले नाही’, असे ते म्हणाले.

रेमडेसिवीर व ऑक्सिजनचा तुटवडा यासाठी योग्य नियोजन कमी पडल्याचे भोंडवे म्हणाले. केंद्र आणि राज्याचे आरोग्य खातं देखील यासाठी तितकेच जबाबदार असून आरोग्य खात्याने यांचं नियोजन करायला हवे असे, त्यांनी नमूद केले.

दरम्यान, पिंपरी चिंचवड व पुण्यात रेमडेसिवीर तसेच, टॉसलीझूमाब इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये इंजेक्शन वेळेत उपलब्ध होत नसल्याने शहरात या इंजेक्शनचा मोठा काळा बाजार होत आहे. काळ्या बाजारात एका इंजेक्शनसाठी पंधरा ते वीस हजार रुपये मोजावे लागत आहेत. पोलिसांनी काळा बाजार करणाऱ्या टोळीवर कारवाई देखील केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.