Pimpri News: ‘पाच वर्षात एकही दिसण्यासारखे विकासकाम नाही; कॉपी पेस्ट अर्थसंकल्प’

अर्थसंकल्पावर विरोधकांची टीका, तर सत्ताधा-यांकडून कौतुक; काही सत्ताधारी नगरसेवकांनी दिला 'घरचा आहेर'

एमपीसी न्यूज – प्रभागाच्या कामात दुजाभाव केला जातो. पुरेशी तरतूद ठेवली जात नाही. भाजपने जाहीरनाम्यात 27 कामे जाहीर केली होती. त्यातील किती पूर्ण झाली याचा जाब आता नागरिक विचारतील. पाच वर्षात 30 हजार कोटींहून अधिक रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. पण, शहरात पाच वर्षात एकही दिसण्यासारखे विकास काम केले नाही. अर्थसंकल्प फुगीर असून प्रत्यक्षात विकास कामे शून्य झाली आहेत. भाजपने केवळ रेगोट्या ओढण्याचे काम केले. कॉपी पेस्ट आणि अक्कलशुन्य अर्थसंकल्पाला आहे, अशी जोरदार टीका विरोधी नगरसेवकांनी केली. तर, सत्ताधारी नगरसेवकांनी सर्वांना समान न्याय दिल्याचे सांगत कौतुक केले. दरम्यान, अनेक सत्ताधारी नगरसेवकांनी विरोधी सूर आळविला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2021-22 या आर्थिक वर्षांचा मूळ 5 हजार 588 कोटी 78 लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 7 हजार 112 कोटी 1 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त राजेश पाटील यांनी 18 फेब्रुवारी रोजी स्थायी समितीला सादर केला होता.

त्याला स्थायी समितीने 250 कोटी रुपयांच्या उपसूचना देत 24 फेब्रुवारी रोजी मान्यता देत अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली होती. त्यावर आज (शुक्रवारी) विशेष सभेत चर्चा झाली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढले असून रुग्णवाढ सुरूच आहे. त्यामुळे प्रत्येकाला पाच मिनिटे बोलण्याची संधी मिळेल असे महापौरांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांनी अर्थसंकल्पावर निवेदन दिले.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगला कदम यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यातच अर्थसंकल्पावर विशेष सभा घेण्याची आवश्यकता होती. आता अर्थसंकल्पावर चर्चा केल्याचा काही उपयोग होणार आहे का, अर्थसंकल्पात बदल होणार आहे का, उपसूचना घेतल्या जाणार आहेत का, याचा खुलासा करण्याची मागणी केली.

त्यावर  31 मार्चपर्यंत बिले अदा केली जाणार आहेत. फक्त प्रशासकीय काम, नवीन हेड ओपन करणे, टोकन तरतुदीत वाढ, घट करण्याच्या उपसूचना स्वीकारल्या जाणार आहेत. मागील कामात तरतूद वाढ करण्याच्या उपसूचना घेतल्या जाणार नसल्याचे सभागृह नेते नामदेव ढाके यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर मनसेचे सचिन चिखले यांनी चर्चेला सुरुवात केली. माझ्या प्रभागात निधी कमी दिला आहे. आम्हीपण शहरातच राहतो. मालमत्ता कर, पाणीपट्टी भरतो. मग, आमच्यावर अन्याय का, अर्थसंकल्पातून निराशा झाली आहे. रेडझोनचे कारण देऊन बजेट कमी दिले असून रेडझोनच्या नावाखाली कायमच अन्याय केला जातो, असे राष्ट्रवादीचे पंकज भालेकर म्हणाले.

भाजपचे संदीप वाघेरे म्हणाले, प्रभाग क्रमांक 21 मधील प्रत्येक कामाला केवळ एक हजार रुपये टोकन ठेवले. पिंपरीसाठी पाच वर्षात फक्त 30 हजार रुपयांचा निधी दिला. पिंपरीला कायम वंचित ठेवले. महापालिका कोणाच्या बापाच्या एकट्याची नाही. भाजपने जाहीरनाम्यात 27 कामे जाहीर केली होती. त्यातील किती पूर्ण झाली. याचा जाब आता नागरिक विचारतील. पाच वर्षात 30 हजार कोटींहून अधिक रकमेच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. शहरात पाच वर्षात एकही दिसण्यासारखे विकास काम केले नाही. राष्ट्रवादीचे भाजपसोबत साटेलोटे आहे.

अपक्ष नीता पाडाळे म्हणाल्या, प्रभागातील रस्त्याच्या कामांना तरतूद ठेवली नाही. काळेवाडीतून कर मिळत नसल्याने निधी दिला जात नसल्याचे अधिकारी सांगतात.

राष्ट्रवादीच्या अपर्णा डोके म्हणाल्या, शहरातील नागरिकांना अर्थसंकल्पातून काय देणार आहोत. मूलभूत गरजांना प्राधान्य दिले पाहिजे. अर्धवट प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत.

शिवसेनेचे प्रमोद कुटे म्हणाले, नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी अर्थसंकल्पात काहीच नाही. शहरात पाहण्यासारखे काहीच नाही. पर्यटन स्थळांचा विकास केला जात नाही. आकुर्डीतील पालखी स्थळाच्या विकासासाठी तुटपुंजी तरतूद केली आहे. यामुळे अर्थसंकल्पाचा मी निषेध करतो.

राष्ट्रवादीचे विनोद नढे म्हणाले, काळेवाडीकरांवर चार वर्षांपासून अन्याय केला जात आहे. प्रभागात राष्ट्रवादीचे नगरसेवक असल्याने पक्षीय राजकारण करत आमच्यावर अन्याय केला जातो.

भाजपच्या सुजाता पालांडे यांनी चार वर्षांपासून बजेटसाठी झगडतो. विशेष प्रकल्पसाठी काहीच दिले नसून हा अन्याय असल्याचे सांगितले.

भाजपचे सचिन चिंचवडे यांनीही प्रभागात डांबरीकरण, इतर कामांसाठी पुरेशी तरतूद नसल्याचे सांगितले. बोगस एफडीआर देऊन महापालिकेची फसवणूक करणारे ठेकेदार आजही कामे करत आहेत. उजळ माथ्याने फिरत आहेत. त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी सूचना केली.

भाजपचे बाबू नायर म्हणाले, नगरसेवक बजेटवर चर्चा करतात. पण, प्रशासन बजेटची अंमलबजावणी करत नाही. भाजपच्या स्वीनल म्हेत्रे यांनीही विकासकामासाठी पुरेशी तरतूद नसल्याचे सांगितले.

भाजपचे अंबरनाथ कांबळे यांनी प्रभागात कमी कामे झाल्याची तक्रार केली. निवडणुकीला केवळ आठच महिने राहिले आहेत.

राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे म्हणाले, भूसंपादनासाठी 150 कोटी मूळ तरतूद होती. मात्र, उपसूचनेद्वारे त्यात 104 कोटी रुपयांची घट केली. फुगीर अर्थसंकल्प आहे.

भाजपच्या आशा शेंडगे यांनी बजेट खर्ची का पडत नाही असा सवाल करत नदी सुधार प्रकल्प कागदावरच आहे. मग, सत्ता राष्ट्रवादीची असो की भाजपची असा सूर आळविला.

भाजपचे अभिषेक बारणे यांनी संथ गतीने चाललेली विकास कामे जलदगतीने करण्याची सूचना केली.

राष्ट्रवादीच्या वैशाली घोडेकर म्हणाल्या, विशेष योजनावरील निधीचे आकडे फुगविलेत. अर्थसंकल्प फुगीर असून काम शून्य आहे. भाजपने केवळ रेगोट्या ओढण्याचे काम केले. राष्ट्रवादीच्या मंगला कदम म्हणाल्या, निराशाजनक अर्थसंकल्प असून निधीत मोठी तफावत आहे. शहरातील नागरिकांना उपयोगी पडेल असा एकही प्रकल्प नाही. कॉपी पेस्ट आणि अक्कलशुन्य अर्थसंकल्प आहे.

भाजपचे तुषार हिंगे यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक करत क्रीडांगणला मोठी तरतूद ठेवली असल्याचे सांगितले.

भाजपच्या शैलजा मोरे म्हणाल्या, मी असमाधानी आहे. प्रभागाला बजेट दिले नाही. ब्लॉक बसवू शकत नाही ही आमची शोकांतिका आहे.

भाजपचे विलास मडिगेरी म्हणाले, अतिशय चांगला अर्थसंकल्प आहे. महिलांच्या विविध योजनांसाठी तरतूद केली आहे. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी चांगली तरतूद केली आहे.

भाजपचे विकास डोळस म्हणाले, भाजपच्या सत्ताकाळात समाविष्ट गावांचा मोठा विकास झाला आहे. दिघी, च-होलीचा कायापालाट झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.