Pimpri News: संकल्प करुन काही होत नाही; चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादीला टोला

विरोधी पक्षांनी आत्तापासूनच गणपतीसमोर सुप-या ठेवल्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. त्याला 14 महिन्यांचा कालावधी आहे. पण, त्याला आत्तापासूनच रंग चढायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या प्रभागनिहाय बैठका सुरु आहेत. त्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षांनी आत्तापासूनच गणपतीसमोर सुप-या ठेवल्या आहेत. गल्ल्यांगल्यांमध्ये फिरत आहेत. त्यांना दाखवून द्या की संकल्प करुन काही होत नाही, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

महापालिका निवडणुकीला दीड वर्षाचा अवधी आहे. पण, विकासकामे करुनही सत्ता गमावल्याने मागील वेळी पालिकेतील सत्ता गेल्याने राष्ट्रवादीने यावेळी कंबर कसली आहे. राज्यात सत्ता असल्याने नेते, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला दिसून येत आहे.

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय बैठका सुरु आहेत. माजी आमदार विलास लांडे यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. त्याची दखल भाजपच्या कार्यक्रमात देखील घेतली गेली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेची 2022 ची निवडणूक जवळ आली आहे. 2022 ची निवडणूक हे मोठे शिवधनुष्य आपल्यासमोर असून ते पेलायचे आहे. विरोधी पक्षांनी आत्तापासून गणपतीसमोर सुप-या ठेवल्या आहेत. गल्ल्यांगल्यांमध्ये फिरत आहेत. त्यांना दाखवून द्या की संकल्प करुन काही होत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.