Pimpri News: सायबर हल्ला प्रकरणी टेक महिंद्रा कंपनीला नोटीस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर रॅन्समवेअर झालेलया हल्ला प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे. त्याबाबतचा सविस्तर अहवाल तीन दिवसांत सादर करावा, अशी नोटीस महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी टेक महिंद्रा लिमिटेड कंपनीला बजावली आहे.

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेविका सीमा सावळे यांनी या प्रकरणात कारवाईची मागणी केली होती. आयुक्त राजेश पाटील यांनी त्याची तत्काळ दखल घेत टेक महिंद्रा कंपनीला नोटीस दिली आहे.

नोटीसमध्ये म्हटले आहे की, या घटनेचे मूळ कारण काय ते स्पष्ट करावे. कंपनीचे काय निरीक्षण आहे ते मुद्देसूद द्या. आगामी काळात याचे काय परिणाम होणार त्याचा तपशिल द्यावा. पुन्हा सर्व परिस्थिती पर्वपदावर कशी येणार ते कळवावे. स्मार्ट सिटी प्रकल्प अंमलबजावणी किती विलंब होणार त्याचा खुलासा करावा.

आगामी काळात पुन्हा असा सायबर हल्ला झाला तर कोणती खबरदारी घेतली आहे आणि यापुढे काय करणार आहात याचा अहवाल तीन दिवसांत द्यावा. या घटनेत नेमके आर्थिक नुकसान कोणते, किती व कसे याचा तपशिल टेक महिंद्रा कंपनीकडून आयुक्तांनी मागविला आहे.

टेक महिंद्रा कंपनी आणि त्यांच्या भागीदार कंपन्या (क्रिस्टल इंटिग्रेटीड सर्व्हिस प्रा. लि. आणि आर्सेस इन्फोटेक प्रा.लि.) यांनी पाच वर्षाच्या काळात स्मार्ट सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी आणि ऑपरेशनची जबाबदारी घेतली आहे. करारातील अटीशर्थी त्यांच्यावर बंधनकारक आहेत. प्रत्यक्षात सायबर हल्ल्यात या अटीशर्थींचा भंग झाल्याचे सिध्द झाले आहे, अशीही तंबी आयुक्त पाटील यांनी नोटिशीत दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.