Pimpri Crime News: आता काळ्या यादीतील ठेकेदारांची फसवणुकीची तक्रार

एमपीसी न्यूज – बोगस एफडीआर प्रकरणात पिंपरी-चिंचवड महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या दोन ठेकेदारांनी त्यांचीच फसवणूक झाल्याची तक्रार पिंपरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

अतुल चंद्रकांत रासकर (वय 36, रा. गणेश साम्राज्य कंपाऊंट, भोसरी) आणि आकाश रामेश्वर श्रीवास्तव (वय 55, रा. अंधेरी वेस्ट, मुंबई) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात स्वतंत्र फिर्याद दिली आहे.

महापालिकेच्या निविदा प्रक्रीयेत खोटी एफडीआर, बँक गॅरंटी सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी महापालिकेने या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून निविदा भरण्यास प्रतिबंध घातला आहे.

रासकर यांच्या फिर्यादीनुसार, ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक स्टॅम्पसाठी संपर्क साधणा-या मोबाईलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रासकर यांची अतुल आर. एम. सी. या नावाने कंपनी आहे.

आरोपीने कंपनीच्या नावाचा गैरवापर करून फिर्यादी रासकर यांच्या नावाच्या खोट्या सह्या करून 19 मार्च 2020 रोजी महापालिकेच्या कामाचा आदेश मिळविला. तसेच 3 लाख 30 हजार रूपयांची खोटी एफडीआर सादर करून रासकर यांची फसवणूक केली.

_MPC_DIR_MPU_II

आकाश श्रीवास्तव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पंढरीनाथ सुभाष म्हस्के (रा. डीएसके विश्व, धायरी) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी म्हस्के यांची निर्मिती इन्फ्रा या नावाची भागिदारीत संस्था आहे.

फिर्यादी श्रीवास्तव यांची म्हाळसा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनी आहे. आरोपी म्हस्के यांनी आपल्या कंपनीत अजून दोन भागीदार असल्याची माहिती श्रीवास्तव यांना दिली. तसेच पुण्यातील कामकाजासंदर्भात म्हस्के हे श्रीवास्तव यांच्या संपर्कात राहिले.

कामाच्या निविदा प्रक्रीयेत लघुत्तम निविदाधारक म्हणून श्रीवास्तव यांच्या कंपनीची निवड झाली. त्यावेळी म्हस्के यांनी उपकंत्राटाची कागदपत्रे सादर करण्याचा प्रस्ताव दिला. फिर्यादी श्रीवास्तव यांच्या कंपनीच्या नावे महापालिकेत निविदा भरून च-होली येथे संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारीत समुहशिल्प परिसरात संत ज्ञानेश्वर सृष्टी उभारण्याचे 6 कोटी 45 लाखाचे काम मिळविले.

या निविदेसाठी सुरक्षा अनामत म्हणून महापालिकेस महाराष्ट्र बँकेची 33 लाख रूपये खोटी बँक गॅरंटी दिली. त्यावर 3 डिसेंबर 2020 रोजी महापालिकेची एक नोटीस फिर्यादी श्रीवास्तव यांच्या ई-मेलवर आली. त्यामध्ये खोटी बँक गॅरंटी दिल्याबद्दल कारवाई का करू नये, याचा खुलासा मागितला.

त्या नोटीसीवरही आरोपी म्हस्के यांनी श्रीवास्तव यांच्या कंपनीची परवानगी न घेता कंपनीचे बनावट लेटरहेड तयार करून कंपनीचे संचालक नागेश पांडे यांच्या खोट्या सह्यांचा वापर करून उत्तर दिले. त्यामुळे महापालिकेने कंपनीला तीन वर्षाकरिता काळ्या यादीत टाकले. यात म्हाळसा कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होऊन कंपनीची फसवणूक झाल्याचे श्रीवास्तव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.