Pimpri News: नाशिक फाटा ते चाकणपर्यंत आता मेट्रोऐवजी मेट्रो निओ धावणार

एमपीसी न्यूज – पुणे महामेट्रोने पहिल्या (Pimpri News) टप्प्यात नाशिक फाटा ते चाकणपर्यंत मेट्रोऐवजी हायस्पीड टायरबेस्ड एलिव्हेटेड मेट्रो निओ मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या मेट्रो निओ मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येत असून, तो लवकरच पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सादर करणार असल्याचे महामेट्रोने आमदार लक्ष्मण जगताप यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागात वाढणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे भविष्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न अधिक जटिल होऊ नये म्हणून आतापासूनच शहरात मेट्रोचे जाळे निर्माण करण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच 10 ते 15 वर्षे रखडलेल्या पिंपरी-चिंचवड ते पुणे मेट्रो मार्गाला गती मिळाली होती. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मेट्रो मार्ग उभारण्याच्या प्रशासकीय कामाला गती दिल्यामुळे आज पिंपरी-चिंचवडकरांचे मेट्रोमध्ये बसण्याचे स्वप्न साकार झाले आहे.

आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन ते निगडीपर्यंत तसेच हिंजवडी ते चाकणपर्यंत मेट्रोचा मार्ग तयार करण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप हे केंद्र व राज्य सरकार तसेच मेट्रो मार्गाची उभारणी करणाऱ्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महामेट्रोकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी आमदार जगताप यांनी केंद्र व राज्य सरकार तसेच महामेट्रोसोबत अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. तसेच अनेकदा स्मरणपत्रे पाठवून पिंपरी ते निगडी आणि हिंजवडी ते चाकणपर्यंतच्या मेट्रोला मंजुरी देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या पत्रव्यवहार आणि पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

महामेट्रोने आमदार लक्ष्मण जगताप यांना पत्र पाठवून (Pimpri News) हिंजवडी ते चाकण मार्गावरील नाशिक फाटा ते चाकणपर्यंत (एकूण 23 किलोमीटर) मेट्रोऐवजी मेट्रो निओ मार्ग उभारण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असल्याचे कळवले आहे. हा अहवाल लवकरच पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सादर केला जाणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे. नाशिक फाटा ते भोसरीपर्यंतची एचसीएमटीआर मार्गिका ही मेट्रो निओ मार्गिकेचा भाग असेल, असेही महामेट्रोने पत्रात स्पष्ट केले आहे.

Amrit Sarovar Yojana : अमृत सरोवर योजनेंतर्गत 100 जलाशयांचा विकास होणार

काय आहे मेट्रो निओ?

भारतातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीतील शहरात गर्दीच्या वेळी तासाला साधारणपणे 5 ते 15 हजार लोक प्रवास करतात. ही प्रवासी संख्या वाहून नेण्याची क्षमता असणारी मेट्रो निओ सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपाय आहे. या मेट्रो निओचे कोचेस, सोयीसुविधा, स्टेशन आणि इतर सगळे मेट्रोसारखेच असेल. फक्त मेट्रो निओचे कोचेस इतर मेट्रोप्रमाणे रुळांवर न चालता रबरी टायरवर चालणार आहेत. मेट्रो निओ विजेवर धावणारी तरीही रबरी टायरची चाके असणारी आहे. मेट्रो निओच्या एका कोचमध्ये साधारणत: 180 ते 250 प्रवासी बसू शकतात. मेट्रो निओ एकावेळी तीन कोचेससह धावते. मेट्रो प्रकल्पासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा मेट्रो निओचा खर्च कमी असल्याने त्याला प्राधान्य दिले जात आहे. मेट्रो निओ एकप्रकारे बससारखीच दिसते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.