Pimpri News: ‘वसुंधरेला स्वच्छ अन् सुंदर’ ठेवण्याची महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची  शपथ

एमपीसी न्यूज – वसुंधरेला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करुन पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही, याची दक्षता घेण्याची शपथ महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी महापौर उषा  ढोरे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर  यांच्या समवेत घेतली.

स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, नगररचना उपसंचालक रा. म. पवार, मुख्य लेखापरिक्षक अमोद कुंभोजकर, शहर अभियंता राजन पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी के.  अनिल रॉय, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, उपआयुक्त मंगेश चितळे, अजय चारठणकर, मनोज लोणकर, नगरसचिव उल्हास जगताप, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सर्व सहाय्यक आयुक्त, सर्व क्षेत्रिय अधिकारी आदी उपस्थित होते.

राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येत आहे. निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित असणा-या या अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकांनी आपला सहभाग या अभियानात नोंदविण्यासाठी “हरित शपथ” घेतली जात आहे.

भारताचा सुजाण नागरिक म्हणून भारतमातेला तसेच या वसुंधरेला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटीबद्ध राहण्याचा आणि पर्यावरणाला त्रास होईल, असे कोणतेही काम करणार नसल्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

जास्तीत जास्त झाडे लावून वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, प्रदुषणमुक्त आणि सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करुन वसुंधरेची काळजी घेण्यासाठी आपण एकत्र येवून काम करण्याची शपथ यावेळी सर्वांनी घेतली.

पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी माझी वसुंधरा अभियान आणि “हरित शपथ” याबद्दल माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.