Pimpri news: जुन्या मिळकतींना करवाढ लादू नये – महापालिका आयुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील जुन्या मालमत्तांच्या करात कोणतीही वाढ करण्यात येवू नये. कोरोना महामारीमुळे घायाळ झालेल्या नागरिकांवर करवाढीचा बोजा लादू नये, अशी आग्रही मागणी महापौर, उपमहापौरांनी प्रशानाकडे केली. त्यावर आयुक्त राजेश पाटील यांनी सन 2021- 22 या आर्थिक वर्षात कुठल्याही मिळकतींना कर लादू नये, असे आदेश संबधित ‍विभागाला दिले आहेत.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार आयुक्त यांच्या अधिकारात सन 2021-22 या आर्थिक वर्षांपासून शहरातील जुन्या मिळमतींच्या करयोग्यमुल्यामध्ये वाढ होणार होती.

परंतु, कोरोना महामारीमुळे करवाढ करु नये म्हणून महापौर ऊषा ढोरे, उपमहापौर ‍हिराबाई उर्फ नानी घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याशी चर्चा करुन यंदाच्या करवाढीला स्थगिती देण्यासंदर्भात सूचना केल्या.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची ड प्रकरण 8 कराधान नियममधील नियम 7 मधील तरतुदीनुसार आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात शहरातील जुन्या व नविन मिळकतींचे करयोग्यमूल्य व बिलामध्ये असलेली तफावत कमी करण्यासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षांपासून जुन्या मिळकतींच्या करयोग्यमुल्याचे पुनर्मुल्यांकन करुन ते स्थायी समितीकडे अवलोकनार्थ पाठविण्यात आले होते.

त्यावर स्थायी समितीने शहरातील नागरिकांवर कोणत्याही प्रकारची करवाढ लादू नये असे सुचविले होते. तसेच यापूर्वीप्रमाणे सुरु असलेली मिळकत करआकारणी यापुढे चालू ठेवावी असा निर्णय घेवून आयुक्तांचा जुन्या मिळकतींच्या करयोग्यमुल्य वाढीचा प्रस्ताव दप्तरी दाखल केला होता.

सर्वसाधारण सभेनेही हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला आहे. या निर्णयामुळे शहरातील निवासी व बिगरनिवासी मिळकत धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे अशी माहिती महापौर ढोरे, उपमहापौर घुले, सत्तारुढ पक्षनेते ढाके यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.