Pimpri News: कोरोना लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पूर्ण

शहरातील 1 लाख 2 हजार 321 नागरिकांनी घेतली कोरोनाची लस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सव्वा दोन महिन्यात शहरातील तब्बल 1 लाख 2 हजार 321 नागरिकांनी कोरोनाची लस टोचवून घेतली आहे. लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात वैद्यकिय क्षेत्रातील लोकांना, फ्रंटर वर्कर यांना प्राधान्याने लस दिल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मार्च पासून सुरु झाला आहे. या टप्प्यात 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्ती (को-मॉर्बिड) आणि 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस टोचण्यात येत आहे. आता 1 एप्रिलपासून 45 वर्षांपुढील सर्वांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.

महापालिकेने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क बंधनकारक, गर्दी टाळणे अशा उपाययोजनांसह लसीकरणावरही भर दिला आहे. आजपर्यंत शहरातील 1 लाख 2 हजार 321 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

”कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित आहे. लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या नागरिकांनी निर्धास्तपणे महापालिकेच्या लसीकरण केंद्रात जाऊन कोरोनाचे लसीकरण करुन घ्यावे”, असे आवाहन महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.