Pimpri News: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ऑनलाईन प्रबोधनपर्व
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विचार प्रबोधनपर्वाचे 18 व 19 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेज आणि यु ट्युब चॅनेलवरुन या कार्यक्रमाचे थेट प्रसारण केले जाणार आहे. नागरिकांनी हे कार्यक्रम घरबसल्या आवर्जुन पहावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवारी (दि.18) दुपारी 4 वाजता महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणा-या या कार्यक्रमावेळी खासदार श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आण्णा बनसोडे, संग्राम थोपटे, उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त राजेश पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
गुरुवारी सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध वक्ते शेखर पाटील यांचे शिवचरित्र आणि आजची युवी पिढी या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी सात वाजता शाहिर प्रसाद विभुते यांचा छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित पोवाड्यांचा कार्यक्रम होईल.
शुक्रवारी (दि.19) दुपारी चार वाजता शिवव्याख्याते तात्यासाहेब मोरे यांचे शिवचरित्रातून काय शिकावे या विषयावर व्याख्यान होणार आहे. शाहिर सुरेश सुर्यवंशी आसंगीकर यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम संपन्न होईल. सायंकाळी सात वाजता होणा-या मराठी पाऊल पडते पुढे या सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रबोधन पर्वाची सांगता होणार आहे.
www.facebook.com/pcmcindia.gov.in या फेसबुक लिंक वर तसेच pcmcindia यु ट्युब चॅनेलवर कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.