Pimpri News: जलतरणपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण घेण्याची संधी आता शहरातच उपलब्ध

एमपीसी न्यूज – शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे (Pimpri News) जलतरणपटू तयार व्हावेत, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रयत्नशील आहे. जलतरणपटूंना तज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळावे याकरिता असे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना शहरातील 7 जलतरण तलाव सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण घेण्याची संधी आता शहरातच उपलब्ध होणार असून  पीपीपी तत्वावर जलतरण तलाव चालविण्यास दिल्यामुळे महापालिकेची प्रतिवर्षी सुमारे 3 कोटी रुपयांची बचत होणार आहे.   

शहराचा उद्योगनगरी म्हणून नावलौकिक आहे. पिंपरी चिंचवड शहराला क्रीडानगरी म्हणून लौकिक मिळवून देण्याच्या दृष्टीने तसेच शहरातील खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. जलतरणपटूंना दर्जेदार प्रशिक्षण घेण्यासाठी तसेच सराव करण्यासाठी पिंपरी चिंचवड  शहराबाहेर जावे लागते. ही सोय याच शहरात उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेने काही तलाव सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे चालविण्यास देण्याचे ठरवले आहे.

Shahu Maharaj Jayanti : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम

तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण (Pimpri News) देणाऱ्या संस्थांना महापालिकेच्या एकूण 14 जलतरण तलावांपैकी 7 जलतरण तलाव सार्वजनिक खासगी भागीदारीतून अर्थात पीपीपी तत्वावर चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. त्या संस्थांकडून  खेळाडूंसाठी स्वतंत्र प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होईल. तसेच, या खेळाडूंना तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण देखील दिले जाईल. कासारवाडी जलतरण तलाव, निगडी जलतरण तलाव, पिंपरी वाघेरे जलतरण तलाव, पिंपळे गुरव जलतरण तलाव, यमुनानगर जलतरण तलाव, वडमुखवाडी चऱ्होली जलतरण तलाव, नेहरूनगर जलतरण तलाव असे 7 तलाव पीपीपी तत्वावर चालविण्यास देण्यात येतील. उर्वरीत तलाव महापालिकेच्या वतीने चालविण्यात येणार आहेत.

जलतरणपटूंना तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण घेण्याची संधी आता शहरातच उपलब्ध करून देण्यासाठी तसेच या माध्यमातून  शहरात जलतरण क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. शहरातील जलतरणपटूंना अशा प्रशिक्षणाचा लाभ होईल, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.