Pimpri News : पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालयांबाबत आदेश जारी

एमपीसी न्यूज – कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविदयालये यांचे नियमित वर्ग तसेच सर्व खाजगी शिकवणी वर्ग 1 ते 14 मार्च या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार आहे. याबाबतचा आदेश आज (रविवारी, दि. 28) आयुक्त राजेश पाटील यांनी जारी केला आहे.

साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील काही काळ निर्बंध आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण अथवा सेवा वगळता 1 मार्च पासून रात्री 11 ते सकाळी 6 यावेळेत संचार करण्यास प्रतिबंध असेल. मात्र दुध, भाजीपाला, फळे आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांना, वृत्तपत्र सेवा आणि अत्यावश्यक सेवा पुरवणा-या आस्थापना व व्यक्तींना तसेच त्यांच्या वाहनांना या आदेशामधून वगळण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

तसेच ज्या उद्योगांचे शिफ्टमध्ये कामकाज चालते अशा संबंधित आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना आणि त्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांना देखील या आदेशामधून वगळण्यात आले आहे. तथापि वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक सेवा यांना या निर्णयातून यापूर्वी दिलेली सवलत कायम असल्याचेही आयुक्त पाटील यांनी स्पष्ट केले.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत शासन तसेच महापालिकेने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश तथा मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत. या आदेशाचा कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी भंग अथवा उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग कायदा 1897 आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व कायद्यातील इतर नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच या आदेशाची अंमलबजावणी आज (दि. 28 फेब्रुवारी) पासून तात्काळ लागू करण्यात येत असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.