Pimpri News: शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये पुन्हा ऑक्सिजनचा तुटवडा

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील खासगी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपत आला आहे. संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक आहे. त्यामुळे काही खासगी हॉस्पिटलने ऑक्सिजनवरील रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्यास सुरुवात केली आहे. खासगी रुग्णालयात सुमारे दीड ते दोन हजार रुग्ण उपचार घेत आहेत.

शहरातील 135 खासगी रुग्णालयांत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 9 हजार खाटा रुग्णांसाठी आरक्षित आहेत. सद्यस्थितीत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये श्वसनाच्या वाढत्या तक्रारींमुळे अधिकाधिक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. परंतु, ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादित असल्यामुळे आणि मागणीत वाढ झाल्याने ऑक्सिजनची कमतरता भासत आहे.

महापालिका हॉस्पिटलमध्ये दिवसाला लिक्विड ऑक्सिजन साधारणतः 50 मेट्रिक टन आणि 30 मेट्रिक टन खासगी हॉस्पिटलला लागतो. अडीच हजार ऑक्सिजनचे जम्बो आणि 15 ते 20 डीवरा सिलेंडर संपूर्ण शहरासाठी लागतात. मात्र, ऑक्सीजनची मागणी आणि पुरवठा यात अंतर पडत आहे. त्यामुळे ऑक्सीजनचा  तुटवडा जाणवत आहे.

आज शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अनेक हॉस्पिटलने ऑक्सिजनवरील पेशंटला शिफ्ट करण्यास सुरुवात केली आहे. महापालिका, खासगी हॉस्पिटल हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यामुळे रुग्णांनी जायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ऑक्सीजन पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे म्हणाल्या, “ऑक्सिजनबाबत आज थोडे पॅनिक फोन येत आहेत. कारण, त्यांना लिक्विड ऑक्सिजन विस्कळीतपणे आज मिळाला आहे. त्यामुळे चार ते पाच हॉस्पिटलचे ऑक्सिजनसाठी फोन येत आहेत.

सर्व हॉस्पिटलला आज ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. लिक्विड ऑक्सिजन एफडीए विभागाकडून लवकर उपलब्ध होत नाही. त्यामुळे पॅनिक परिस्थिती तयार होते. मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा आता काही प्रश्न नाही. जे लिक्विड ऑक्सिजन वापरतात. त्यांचा अजिबात प्रश्न नाही. परंतु, छोटे छोटे रिफिलर सिलेंडर वापरत असलेल्या हॉस्पिटलला अडचण निर्माण होत आहे.

महापालिका हॉस्पिटलमध्ये दिवसाला लिक्विड ऑक्सिजन साधारणतः 50 मेट्रिक टन आणि 30 मेट्रिक टन खासगी हॉस्पिटलला लागतो. अडीच हजार जम्बो सिलेंडर लागतात. 15 ते 20 डीवरा सिलेंडर लागतात. शहरातील छोट्या हॉस्पिटलमध्ये तुटवडा आहे. मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुटवडा नाही. शिवाय छोट्या रिफिलरसाठी पुरेसे लिक्विड आलेले आहे. पण, एफडीएकडून त्याचे व्यवस्थित वाटप होत नसल्याचे दिसून येत आहे”.

हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे डॉ. प्रमोद कुबडे म्हणाले,  “अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नाही. काही हॉस्पिटलमधील ऑक्सिजन रात्रीच संपेल. ऑक्सिजन व्हेंडर्सने उद्या ऑक्सिजन मिळणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा परिस्थिती फार बिकट होणार आहे.

खासगी हॉस्पिटलमध्ये दीड ते दोन हजार पेशंट उपचार घेत आहेत. ऑक्सिजनअभावी आज रात्री भयाण परिस्थिती होण्याची शक्यता आहे. अनेक हॉस्पिटलने पेशंटला दुसरीकडे शिफ्ट करण्यास सुरुवात केली आहे. शिफ्ट करायलाही जागा राहिली नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.