Pimpri News : किशोरवयीन मुलामुलींच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालकांनीच पुढाकार घ्यावा – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – सध्याच्या काळात किशोरवयीन मुलामुलींचा प्रश्न हा त्यांच्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. पालकांना मुलांच्या समस्या आणि त्यांच्या मानसिकतेला सामोरे जावे लागत आहे. याकरीता ‘टिन टॉक्स’ हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन उपयुक्त ठरणार आहे. किशोरवयीन मुलामुलींच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालकांनीच पुढाकार घ्यावा, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

स्टेप अप फाऊंडेशनने विकसीत केलेल्या टिन टॉक्स या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमात सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी पराग मुंढे, स्टेप अप फाऊंडेशनच्या अध्यक्षा गौरी वैद, विश्वस्त राधिका गांगल, डॉ. शिशिर जोशी, निधी साने, डॉ. श्वेता जोशी, मंजूश्री राऊत आदी उपस्थित होते. हा प्रकल्प सीएसआर उपक्रमांतर्गत अथेना हेल्थ टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेड या कंपनीतर्फे प्रायोजित करण्यात आला.

महापौर ढोरे म्हणाल्या, “किशोरवयीन मुलामुलींच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी हा उपक्रम पालक व शिक्षकांची मदत करेल. याला शहरातील नागरिक चांगला प्रतिसाद देतील.”

_MPC_DIR_MPU_II

गौरी वैद यांनी या उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की, स्टेप अप फाऊंडेशन ही संस्था मागील 10 वर्षांपासून किशोरवयीन मुलामुलींचा अभ्यास आणि त्यावर परिक्षण करीत आहे. संस्थेचा ‘किशोरवयीन आरोग्य’ हा प्रमुख विषय आहे. मुलं वयात येताना त्यांच्यामधे अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात. त्यामुळे त्यांचं वागणं बोलणं, सवयी सगळ्यातच बदल प्रकर्षाने जाणवतात. त्याचबरोबर मुलांना या वयात अनेक प्रश्न पडत असतात. लहान असताना मुलं हे प्रश्न आपल्या पालकांना विचारतात. पण पौगंडावस्थेत मुलांना हाताळणं पालकांना अवघड जातं. बऱ्याचदा या प्रश्नांची उत्तरं देताना अवघडल्यासारखं देखील होतं आणि मग मुलं याची उत्तरं इंटरनेटवर किंवा मित्र-मैत्रिणीकडून मिळवतात.

सध्या कोरोनाच्या परिस्थितीत मुलं पूर्णवेळ घरात आहेत. त्यामुळे त्यांच्या शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यावर ही दुष्परिणाम झालेला दिसत आहे. ज्यामुळे सतत कंटाळा येणं, चिडचिडेपणा वाढणं, बऱ्याचदा उदास वाटणं, पालकांबरोबर सतत वादविवाद होणं असे परिणाम दिसून येतात. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीत सगळ्याच गोष्टी ऑनलाईन सुरू आहेत. त्यामुळे मुलांना आधीपेक्षा जास्तवेळ आणि मोकळेपणाने इंटरनेट हे माध्यम मिळाले आहे.

त्यामुळे वाईट फिल्म्स पाहणं, त्याविषयी मित्र-मैत्रिणींबरोबर चर्चा करणं त्यातून चुकीची माहिती मिळणं, याचा धोकाही वाढतो आहे. शिवाय मित्रांकडून मिळालेली ही माहिती बऱ्याचदा अर्धवट आणि चुकीचीही असू शकते. ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून पालकांनीच योग्य वयात मुलांना योग्य माहिती द्यावी, त्यांनीच सक्षम व्हायला हवं. पालक आणि मुलांमध्ये मोकळा संवाद सुरू व्हावा. पालकांना आणि शिक्षकांना मुलांना हाताळणं सोपं जावं यासाठी संस्थेने ‘टीन टॉक्स’ या अ‍ॅपची निर्मिती केली आहे.

या अ‍ॅपमध्ये सोप्या भाषेत किशोरवयीन मुलांविषयीचे शैक्षणिक व्हिडिओ यामध्ये आहेत. जे मुलांना त्यांच्या वयानुसार टप्प्याटप्याने दाखवता येतील. या अ‍ॅपद्वारे मुलं, पालक व शिक्षक वा इतर कोणीही किशोरवयीन मुलांसंदर्भात मोफत समुपदेशन घेऊ शकतात. याचबरोबर मोफत प्राथमिक शिक्षण सुद्धा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत अ‍ॅपद्वारे दिले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.