Pimpri News: शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसद महारत्न पुरस्कार’ जाहीर

दिल्लीत शनिवारी होणार पुरस्कार वितरण

एमपीसी न्यूज – लोकसभेतील उत्कृष्ट कामकाजाबद्दल सलग पाच वर्षे ‘संसद रत्न’ पुरस्कार मिळालेले मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसद महारत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. चेन्नई येथील प्राईम पाँईंट फाऊंडेशनच्या वतीने बारणे यांना ‘संसद महारत्न पुरस्कार’ देवून गौरविण्यात येणार आहे.

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि न्यायाधीश ए.के. पटनाईक यांच्या हस्ते या पुरस्काराचे उद्या (शनिवारी) दिल्लीत वितरण होणार आहे. पुरस्कार समितीचे अध्यक्ष, संसदीय कार्यमंत्री मंत्री अर्जुन मेघवाल, प्राईम पाँईंट फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीनिवासन आदी यावेळी उपस्थित असणार आहे.

संसदेतील उत्कृष्ट काम, चर्चेत सहभाग, अधिकाधिक प्रश्न मांडणे, खाजगी विधेयके, सभागृहातील उपस्थिती, मतदारसंघात विकास निधी, योजनांवर करत असलेल्या खर्चाच्या आधारावर हा पुरस्कार दिला जातो.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना सोळाव्या लोकसभेत सलग पाच वर्ष उत्कृष्ट कामकाजाबद्दल ‘संसद रत्न’ पुरस्कार मिळाला होता. सातत्याने सलग पाच वर्षे संसदरत्न पुरस्कार मिळणा-या खासदाराला ‘संसद महारत्न’ पुरस्कार दिला जातो.

खासदार बारणे यांना हा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा खोवला आहे.

पुरस्कार्थींमध्ये महाराष्ट्रातील चार आणि देशाच्या इतर भागातील अन्य चार अशा आठ खासदारांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील खासदारांची संसदेतील कामगिरी सर्वोत्तम आहे. या पुरस्काराने महाराष्ट्रातील, देशातील खासदारांना यापूर्वी गौरविण्यात आले आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर सलग दु-यावेळी विश्वास टाकला. त्यांच्या विश्वासामुळे हे सर्व शक्य झाले आहे. नागरिकांच्या विश्वासाला मी पात्र ठरलो आहे. संधीचा उपयोग नागरिकांसाठी करत आहे. हा सन्मान माझा नसून मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांचा आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.