Pimpri News: पथारीवाल्यांचे सर्वेक्षण होणार, खासगी संस्थेची नियुक्ती

एमपीसी न्यूज – पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील पथारीवाल्यांचे सर्वेक्षण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात केले जाणार आहे. त्यानुसार, हॉकर्स झोन निर्माण केले जाणार आहेत. सर्वेक्षणासाठी महापालिकेतर्फे खासगी संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे.

महापालिकेने 2012-13 मध्ये शहरातील टपरी, हातगाडी, पथारी व फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यानंतर बायोमेट्रीक सर्वे झाला. पात्र-अपात्र लाभार्थी ठरविण्यात आले. मात्र, हॉकर्स झोनचा विषय कागदावरच राहिला.

आता पुन्हा खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्याचा कालावधी 30 दिवसांचा असेल. महापालिका वॉर्डनिहाय सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धती वापरली जाणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

पथविक्रेत्याचा व्यवसाय, त्याच्या छायाचित्रासह माहिती भरायची आहे. यासाठीचे मनुष्यबळ संस्थेने पुरवायचे आहे. महापालिका केवळ अर्जाचा नमुना व ऑनलाइनसाठी सॉफ्टवेअर उपलब्ध करून देणार आहे.

माहिती संकलित करणे, अपलोड करणे, ओळखपत्र देणे, हॉकर्स प्रमाणपत्र देणे, त्यात दुरुस्त्या करण्याचे काम संस्थेने करायचे आहे. या अंतर्गत ओळखपत्रासाठी 20 रुपये, हॉकर्स प्रमाणपत्रासाठी लॅमिनेशनसह 25 रुपये आणि मनुष्यबळासाठी 75 रुपये असा 120 रुपये खर्च होणार आहे.

सन 2012 च्या सर्वेक्षणात 10 हजार 188 विक्रेत्यांची नोंदणी

महापालिकेने 2012-13 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार 10 हजार 188 जणांची नोंदणी झाली होती. त्यातील पाच हजार 900 जणांचे बायोमेट्रिक पूर्ण झाले होते. 1 हजार 270 जण अपात्र ठरले होते. 4 हजार 288 जणांचे बायोमेट्रिक राहिले होते. त्या वेळी सहा बाय चार फुट लांबी-रुंदीचा गाळा देण्याचे ठरले होते. मात्र, हॉकर्स झोनची ठिकाणे निश्चित न झाल्याने हा विषय केवळ कागदावरच राहिला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.