Pimpri Corona news: यापुढे खासगी रुग्णालयाच्या ‘आयसीयू’तील रुग्णांना महापालिका रुग्णालयातील ‘आयसीयू’त घेतले जाणार नाही

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) जागा शिल्लक नाही. जे रुग्ण पालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल आहेत, त्यांनाच अतिदक्षता विभागामध्ये घ्यावे लागते. त्याची संख्या सुध्दा मोठी आहे. त्यामुळे यापुढे खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णांना महापालिका रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये भरती करुन घेतले जाणार नाही. याबाबतचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील 101 हून अधिक कोविड रुग्णालयांना महापालिकेने मान्यता दिली आहे. खासगी रुग्णालयात गंभीर परिस्थिती होईपर्यंत रुग्णाला दाखल केले जाते. रुग्णांची परिस्थिती खूपच गंभीर झाल्यानंतर त्याला महापालिका रुग्णालयात पाठविले जाते. रुग्ण गंभीर असल्याने दगावतात. रुग्ण दगावल्यास महापालिकेला स्पष्टीकरण द्यावे लागते.

शहरातील कोविड हॉस्पिटलमध्ये काही रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. काही कारणास्तव या रुग्णांना महापालिकेच्या आयसीयूमध्ये स्थलांतरीत करतात. त्यामुळे महापालिकेच्या अतिदक्षता विभागावरती ताण येत आहे. तसेच रुग्ण अत्यंत गंभीर परिस्थिती Critical Condition मध्ये असल्याने तो दगावल्यास महापालिकेला याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागते.

सद्यस्थितीमध्ये महापालिकेच्या अतिदक्षता विभागामध्ये सुध्दा जागा शिल्लक नाही. जे रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल आहेत त्यांनाच अतिदक्षता विभागामध्ये घ्यावे लागते. त्याची संख्या सुध्दा मोठी आहे. त्यामुळे यापुढे खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णांना महापालिका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये भरती करुन घेतले जाणार नाही.

बालेवाडीत विलगीकरणासाठी 150 खाटांची सोय !

महापालिकेच्या वायसीएमएच, जम्बो कोविड सेंटर, अँटो क्लस्टर सेंटरमध्ये कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. काही दिवसांच्या उपचारानंतर रुग्ण बरे होत असतात. परंतु, त्यांना विलगीकरणाची आवश्यकता असते. अशा रुग्णांना टप्प्याटप्प्याने सामान्य परिस्थितीमध्ये आणावे लागते. त्यांच्यातील लक्षणे जाईपर्यंत रुग्णांना विलगीकरणात ठेवावे लागते. अशा रुग्णांसाठी बालेवाडी येथील कोविड केअर सेंटर (CCC) येथे 150 खाटांची व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. त्या ठिकाणी Step Down रुग्णांना ठेवण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.