Pimpri News: गृहविलगीकरणातील रुग्णांनी दररोज सहा मिनिटे वॉक टेस्ट करावी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सद्यस्थितीत जवळपास 70 टक्के रुग्ण हे गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. सौम्य लक्षणे असली तरी नियमित ऑक्सिजनची तपासणी करणे गरजेचे. दिवसातून चार वेळा घरच्या घरी ऑक्सिजनची पातळी तपासावी आणि त्याची नोंद करून ठेवावी. याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांना द्यावी. असे केल्यास रुग्णाला उपचार घेण्यास मदत होईल. सध्या 6 हजार 239 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 2 हजार 216 रुग्ण गृहविलगीकरणात असून 4 हजार 23 सक्रीय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनाची लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्ती तसेच गृहविलगिकरणात असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात.पल्स ऑक्सिमीटर किंवा डिजिटल घड्याळ याचा वापर करून घरच्या घरी ऑक्सिजन तपासणी करणे शक्य आहे. दररोज सहा मिनिटे चालून ही तपासणी करता येते. चालण्यापूर्वी ऑक्सिजन पातळी 96 ते 97 टक्के असेल आणि सहा मिनिटे चालल्यानंतरही ऑक्सिजन पातळी जर 93 टक्क्या पेक्षा कमी झाली नाही. तर कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. परंतु रुग्णाने ही तपासणी घरी नियमित करणे गरजेचे आहे. रुग्ण ज्या डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. त्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच करून ठेवलेली नोंद त्यांना सांगणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी अचानक खाली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे. ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्ती तसेच गृहविलगिकरणात असणारे रुग्ण ही चाचणी करु शकतात. जर सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी 93 टक्क्यांपेक्षा कमी होत असेल. चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा 3 टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा चालल्यानंतर धाप लागल्यासारखे वाटत असेल, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

…अशी करावी चाचणी!
ही चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यानंतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे. (पायऱ्यांवर चालू नये) यादरम्यान अतिवेगात किंवा हळूहळू चालू नये, तर मध्यम चालावे. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी. सहा मिनिटे चालूनही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही, तर प्रकृती उत्तम असे समजावे.

महापालिका वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, “गृहविलगिकरणात असलेल्या रुग्णांनी नियमित ऑक्सिजन तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच त्याची नोंद करून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.