Pimpri News: विनामस्क फिरणाऱ्याकडून पाचशे रुपयांऐवजी दोनशे रुपये दंड घ्या – अमित गोरखे

एमपीसी न्यूज – विनामस्क फिरणाऱ्या नागरिकांवर महापालिका अधिकारी आणि पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. परंतु, दंडाची रक्कम जास्त आहे. कामगारनगरीतील नागरिकांना तो परवडणारा नाही. त्यामुळे विनामस्क फिरणाऱ्यांकडून पाचशे रुपयांऐवजी दोनशे रुपये दंड घ्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात गोरखे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. प्रशासनाकडून विनामस्क फिरणाऱ्या नागरिकांवरील दंडात्मक कारवाईचा निर्णय चांगला आहे. सध्या पोलिसांमार्फत ही कार्यवाही चांगल्या पद्धतीने चालू आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक मजूर गरीब, कामगार वर्ग दिवसभराचे काबाड कष्ट करून आलेला असतो. अशा परिस्थितीत अशा गरीब जनतेला पाचशे रुपये दंड हा अतिशय जास्त होतो असे वाटते. विनामस्क फिरणाऱ्याकडू दंड जरूर घ्यावा. पण, दंडाची रक्कम पाचशेरुपये ऐवजी दोनशे रुपये करावी. जेणेकरून गरीब मोलमजुरी करणाऱ्या लोकांना याचा फटका बसणार नाही, अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव गोरखे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.