Pimpri News: मूळ कराचा भरणा केल्याशिवाय शास्तीकर माफ होणार नाही

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार चौरस फुटापुढील 31 हजार 616 मालमत्तांचा शास्तीकर माफीचा शासन निर्णय प्रसिद्ध (Pimpri News) झाला आहे. अवैध बांधकाम मालमत्ता धारकांनी मूळ कराचा संपूर्ण भरणा केल्याशिवाय शास्तीकर माफी होणार नाही. अवैध बांधकाम शास्ती माफ झाली म्हणजे ही बांधकामे नियमित झाले असे समजण्यात येणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा आदेश केवळ धूळफेक असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 91 हजार 150 मालमत्ता आहेत. त्यातील 97 हजार 699 अवैध मालमत्तांना शास्तीकर लागू झाला होता. शहरात अवैध बांधकाम शास्ती रकमेचे प्रमाण मूळ करापेक्षा जास्त आहे. त्यामुळे शास्तीकर भरण्याबाबत मालमत्ता धारकांमध्ये उदासीनता आढळून येते.

भविष्यात शास्ती माफ होईल. या अपेक्षाने मालमत्ताधारक शास्तीसह मूळ कराचाही भरणा करत नाहीत. त्यामुळे शास्ती माफ केल्यास मूळ कराचा भरणा होईल. स्थायी उत्पन्नात वाढ होईल या हेतूने शासनाने अवैध बांधकामांचा शास्ती कर माफ केला आहे. 31 हजार 616 मालमत्तांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

अवैध बांधकाम मालमत्ताधारकांनी प्रथम मूळ कराचा संपूर्ण भरणा करणे आवश्यक आहे. त्यानंतर शास्तीकर माफ करण्यात येईल. शास्तीमाफी आजपर्यंतच्या अवैध बांधकामांना लागू राहील. अवैध बांधकाम शास्ती माफ झाली म्हणजे ही बांधकामे नियमित झाले असे समजण्यात येणार नाही. शास्ती माफ करण्यात आल्याने त्यापोटी महापालिकेला राज्य शासनाकडून कोणतेही आर्थिक सहाय्य अथवा नुकसान (Pimpri News) भरपाईची मागणी करता येणार नाही, शासन आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.