Pimpri News : पावसाळ्यापूर्वी शहरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : सतीश मरळ

एमपीसीन्यूज : गेल्या वर्षी पावसाळ्यात पुण्यात होर्डिंग कोसळून निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला होता. अशी घटना पिंपरी चिंचवड शहरात घडू नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच पावसाळा सुरु होण्यापूर्वी शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल सुरक्षा ऑडिट करावे, अशी मागणी निगडी- यमुनानगर शिवसेना विभागप्रमुख सतीश मरळ यांनी केली आहे.

या संदर्भात मरळ यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पुढील महिन्यापासून पावसाळा सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे पावसाळापूर्व कामे हाती घेण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार शहरातील नालेसफाई तसेच नदीतील जलपर्णी हटविणे, झाडांच्या धोकादायक फांद्या छाटणे आदी कामे केली जातात. जेणेकरून शहरात कोणतीही जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते.

सध्या पिंपरी चिंचवड शहरात प्रत्येक चौकात, रस्त्यावर जाहिरातीचे मोठ मोठे होर्डिंग लावलेले आहेत. एकीकडे आपण स्मार्ट शहर म्हणुन नावारूपास येत आहोत, अशा होर्डिंगमुळे आपले स्मार्ट शहर विद्रुप झाले आहे.

पावसाळ्याच्या दिवसात होर्डिंग पडून दुर्घटना होऊ नये, यासाठी शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल सुरक्षा ऑडिट करावे. ऑडिट न केल्यास व एखादी दुर्घटना झाल्यास त्यास महानगरपालिकेला जबाबदार धरले जाईल, असा इशाराही मरळ यांनी निवेदनात दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.