pimpri news : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार

फोटो आहेएमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरामध्ये सार्वजनिक वर्दळी तसेच वस्त्यांच्या ठिकाणी असलेल्या आणखी 300 रोहित्रांना लोखंडी पत्र्याचे सुरक्षा आवरण लावण्यात येणार आहे. यामध्ये वीजखांबावर असलेल्या 200 आणि सिमेंट क्रॉंकिटचे चौथऱ्यावर असलेल्या 100 रोहित्रांचा समावेश आहे.  दरम्यान, पिंपरी व भोसरी शहरामधील रोहित्रांच्या परिसरातील साफसफाई तसेच देखभाल व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. सोमवार (दि. 28) पर्यंत 1901 रोहित्रांच्या परिसरातील झाडीझुडपे, वेली काढणे, रोहित्रांची तपासणी करणे, आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे आदी कामे करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात महावितरणचे पिंपरी व भोसरी असे दोन विभाग आहेत. सद्यस्थितीत पिंपरीमध्ये 2884 तर भोसरीमध्ये 3173 असे एकूण 6057 रोहित्र आहेत. यापैकी 2299 हे बंदिस्त खोलीमध्ये तर उर्वरित 3758 रोहित्र सार्वजनिक ठिकाणी आहेत. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांना महावितरणकडून लोखंडी जाळ्यांचे कुंपण घातलेले आहे.

तसेच रस्त्याबाजूला, वस्त्यांजवळ, बाजार किंवा नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या 441 रोहित्रांना यापूर्वीच लोखंडी पत्र्याचे सुरक्षा आवरण लावण्यात आले आहे. या सुरक्षा आवरणामुळे रोहित्रातील तांत्रिक बिघाडामुळे ऑईल गळती, स्पार्कींग आदींचा परिसरासाठी धोका राहणार नाही. आता आणखी 300 रोहित्रांना हे सुरक्षा आवरण लावण्यात येणार आहे.

महावितरणकडून वर्षभर देखभाल व दुरुस्तीचे काम केली जातात. यामध्ये रोहित्रांची विशेष काळजी घेऊन सर्व प्रकारची देखभाल व दुरुस्ती केली जाते. ही कामे नियमित व जलदगतीने करण्यासाठी यंदापासून तीन वर्षांसाठी पिंपरी चिंचवड शहरासाठी 19 एजन्सीजचे पॅनेल तयार करण्यात आले आहे.

या एजन्सीजमुळे महावितरणचे अभियंता, कर्मचाऱ्यांना आणखी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत आहे. तसेच संयुक्तपणे रोहित्राची योग्य देखभाल करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये रस्त्याबाजूच्या रोहित्राखाली छोटे व्यवसाय करणारे किंवा रोहित्राजवळच घराचे किंवा अन्य अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण होत असल्याचे दिसून येत आहे. हे अतिक्रमण हटविण्यासाठी महावितरण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका संयुक्तपणे कारवाई करणार आहे. महावितरणने याबाबत आग्रही भूमिका घेत महानगरपालिकेकडे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे.

विद्युत यंत्रणेजवळ असलेल्या अतिक्रमणाची माहिती महावितरणकडून नियमित स्वरुपात महानगरपालिकेला दिली जाणार आहे.

नागरिकांनीसुद्धा रोहित्र किंवा इतर विद्युत यंत्रणेजवळ अनधिकृत बांधकाम करू नये तसेच रोहित्रांच्या कुंपणात सुका किंवा ओला कचरा टाकू नये व या यंत्रणेपासून नेहमी सुरक्षित, सावध व सतर्क राहावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.