Pimpri News: पश्चिम बंगाल हिंसाचाराच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड भाजपाची निदर्शने

एमपीसी न्यूज – पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करीत पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने आज (बुधवारी) निदर्शने करण्यात आली.यावेळी तृणमूल काँग्रेसचा धिक्कार असो… पश्चिम बंगाल सरकारचा धिक्कार असो… अशा घोषणा देण्यात आल्या.

भाजपच्या मोरवाडी,पिंपरी येथील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.  यावेळी शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस राजू दुर्गे, नगरसेवक कुंदन गायकवाड, प्रसिद्घीप्रमुख संजय पटनी आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा प्रकार म्हणजे लोकशाहीचा खून आहे, असा संताप आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.

आमदार लांडगे म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे.

पश्चिम बंगाल निवडणुकीत महाराष्ट्रातील पुरोगामी म्हणवणाऱ्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला. मात्र, त्याच बंगालमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरांची जाळपोळ झाली. 30 ते 35 लोकांची हत्या झाली. यावर साधा निषेधही महाराष्ट्रातील नेत्यांनी नोंदवण्याची संवेदनशीलता दाखवली नाही, अशी टीका आमदार महेश लांडगे यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.