Pimpri news: खड्डे खोदाई, रोपे, मास्क, हातमोजे पालिकेचे? अन सेवासप्ताह भाजपचा

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त राज्य भाजपतर्फे सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहर भाजपने पालिकेतील सत्तेचा पुरेपूर लाभ उचलला आहे. खिशाला कोणतीही झळ बसू न देता खड्डे खोदाई, रोपे, मास्क, हातमोजे सर्व साहित्याचा खर्च पालिकेच्या माथी मारल्याची चर्चा आहे.

करदात्यांचे पैसे आणि उदोउदो, गवगवा मात्र भाजपचा केला आहे. याबाबत भाजपच्या वर्तुळात तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी असे काही नसल्याचा दावा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त राज्य भाजपने सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे.  पिंपरी- चिंचवड शहर भाजपतर्फे देखील सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. सोमवारपासून त्याला सुरुवात झाली आहे. सोमवारी पालिकेची रोपे घेऊन पालिकेनेच खोदलेले खड्यात ठिकठिकाणी भाजप नगरसेवकांनी वृक्षारोपण केले. फोटोसेशन केले आणि नगरसेवक निघून गेले. काही झाडे जळाली, मेली मात्र परत त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. दिखावा करत शिर्षस्थ नेत्यांच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याचा हा प्रकार आहे.

महापालिकेचे सहा हजार कोटींचे बजेट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने शहरातील नागरिकांना मास्क वाटले. सफाई कर्मचाऱ्यांना हातमोजे दिले जात आहेत. भाजपने याचाच वापर केला असल्याची चर्चा आहे. पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. 77 नगरसेवक आहेत. खिशाला मात्र कोणतीही झळ पोहचू दिली जात नाही. भाजपचा की पालिकेचा सेवासप्ताह आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

याबाबत बोलताना भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे म्हणाले, ”रोपे, मास्क, हातमोजे पालिकेचे नाहीत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच सर्व खर्च केला आहे”.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.