Pimpri News : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड निर्णायक भूमिकेत 

शहर भाजपकडून 18 हजार पदवीधर मतदारांची नोंदणी

एमपीसी न्यूज – पुणे पदवीधर विधानसभा मतदारसंघ जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करणाऱ्या पिंपरी-चिंचवड भाजपने शहरातील तब्बल 18 हजार पदवीधर मतदारांची नोंदणी करून घेतली आहे.

विशेष म्हणजे प्रदेश भाजपने पिंपरी-चिंचवड भाजपला 15 हजार पदवीधर मतदारांच्या नोंदणीचे उद्दीष्ट दिले होते. त्यापेक्षा अधिकच्या 3 हजार पदवीधर मतदारांची नोंदणी करून पदवीधर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आमची भूमिका निर्णायक असेल, हे पिंपरी-चिंचवड भाजपने स्पष्ट केले आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर मतदारांच्या नोंदणीचे काम सुरू केले होते. पिंपरी-चिंचवड भाजपला शहरातील 15 हजार पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यानुसार पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने पदवीधर मतदार नोंदणीचा कार्यक्रम आखून काम केले.

पदवीधर मतदार नोंदणीसाठी पिंपरी-चिंचवड नोंदणीप्रमुख म्हणून पक्षाचे शहर संघटक सरचिटणीस अमोल थोरात यांची नेमणूक करण्यात आली होती. तसेच चिंचवड विधानसभा नोंदणीप्रमुखपदी ॲड. मोरेश्वर शेडगे, पिंपरी विधानसभा नोंदणीप्रमुखपदी राजू दुर्गे, भोसरी विधानसभा प्रमुखपदी विजय फुगे यांना जबाबदारी देण्यात आली होती. या सर्व विधानसभा प्रमुखांनी 32 प्रभागांचे 32 पदाधिकारी व कार्यकर्ते यांना समन्वयक म्हणून नेमले होते. या सर्वांनी गेल्या दहा दिवसातच व्हर्चुअल सभा, प्रभाग सभा, बैठका व वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातून नगरसेवक व कार्यकर्ते यांच्याशी प्रत्यक्षत संपर्क साधून ऑफलाईन व ऑनलाईन माध्यमातून प्रदेश भाजपने दिलेल्या उद्दिष्टपेक्षाही जास्त 18 हजार पदवीधरांच्या नोंदणीचा टप्पा ओलांडला आहे.

शहर भाजपाच्या वतीने रविवारी 1 नोव्हेंबर रोजी संपूर्ण शहरात ‘पदवीधर मतदार नोंदणी’ महाअभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बूथ स्तरावर प्रमुख सोसायट्या, चाळी, वस्त्या असा सुमारे 125 ठिकाणी बूथ लावून एकाच दिवशी एकाच वेळी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणी अभियान राबविले. त्यामुळे शहरातील 18 हजार पदवीधरांची नोंदणी करणे शक्य झाल्याचे पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे संघटक सरचिटणीस अमोल थोरात यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.